पहा फोटो –
महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन तेथील प्रेक्षकांच्या समोर ‘चला हवा येऊ द्या’ चे काही विशेष
भाग चित्रीत होत असून याची अतिशय दणक्यात सुरूवात ९ डिसेंबरला पनवेल येथून झाली. आता
या दौ-याचा पुढचा टप्पा असणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा भाग. यानिमित्ताने येत्या १६ डिसेंबरला
सांगलीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘चला हवा येऊ द्या’ चा हा सोहळा पार पडतो आहे.
यामध्ये सहभागी होणार आहे झी मराठीवरील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘दिल दोस्ती
दुनियादारी’ मालिकेतील कलाकार. सांगली येथे चित्रीत झालेले हे भाग येत्या २१ आणि २२ डिसेंबरला
झी मराठीवरून प्रसारित होतील.
कोल्हापुरातही धम्माल – चला हवा येऊ द्या च्या टीमने कोल्हापुर शहरातही विविध ठिकाणी भेट देऊन एकच धम्माल उडवून दिली. कोल्हापुरमधील महालक्ष्मी मंदिरात अनेक चाहत्यांच्या गराड्यात या टीमने अंबाबाईचे आशीर्वाद घेतले. त्यांनतर रंकाळा तलावावर सर्वांनी बोटींगचाही आनंद लुटला. कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या करवीरनगरीत एका कुस्तीच्या आखाड्यालाही भेट दिली. विशेष म्हणजे विनीत बोंडेने कुस्तीच्या आखाड्यात उतरून पहिलवानांशी दोन हातही केले ज्यात त्याला धोबीपछाड मिळाला. ही सगळी धम्माल येत्या 21 आणि 22 डिसेंबरला सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वा. झी मराठीवरून बघायला मिळणार आहे.
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने पहिल्या भागापासूनच रसिक प्रेक्षकांच्या मनाची
पकड घेतली. आठवडयागणिक ती अधिकच मजबूत होत गेली आणि आता तर घराघरात लहानांपासून
मोठ्यांपर्यंत हा कार्यक्रम जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांच्या
प्रसिद्धीसाठीचं सशक्त व्यासपीठ म्हणून या कार्यक्रमाकडे बघितलं जातं. प्रत्येक भागात काही तरी
नविन आणि हास्याचा धमाका उडवून देण्याचं काम करणारी मंडळी म्हणजेच भाऊ कदम, भारत
गणेशपुरे, कुशल बद्रिके, , सागर कारंडे, विनित बोंडे, श्रेया बुगडे आणि या सर्वांचा सुत्रधार म्हणजेच डॉ.
निलेश साबळे या सर्वांच्या विनोदाची चौफेर फटकेबाजी या कार्यक्रमात बघायला मिळते. या
कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. यातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांची विनोदाची
फटकेबाजी प्रत्यक्ष बघावी ही अनेकांची इच्छा असते परंतु प्रत्येकच प्रेक्षकाला त्यांच्यापर्यंत पोहचणं
शक्य नसतं. त्यामुळेच मग या रसिक प्रेक्षकांना भेटण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम निघाली
आहे महाराष्ट्र दौ-यावर. एरवी स्टुडिओमध्ये मोजक्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा हा कार्यक्रम आता
विविध शहरांतील आणि गावांतील प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष जाणार आहे. नेपथ्यापासून ते सादरीकरणापर्यंत
अनेकविध नव-नव्या गोष्टी या दौ-यात बघायला मिळणार आहेत. सांगलीमध्ये चित्रीत होणा-या या
विशेष भागांमध्ये दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील सुजय, कैवल्य आशूतोष, अॅना, मीनल आणि
रेश्मा या माजघरातील दोस्तांसोबतच राकेश, निशा आणि कबीर ही मंडळी आणि दिग्दर्शक विनोद
लव्हेकर व निर्माते संजय जाधव सांगलीकरांच्या भेटीस येत आहेत. धम्माल गाणी, नृत्य आणि
अफलातून विनोदी स्किट्स आणि गप्पांमधून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा प्रवास उलगडत
जाणार आहे. सांगलीकरांसोबत रंगणा-या या भागाचं प्रसारण येत्या २१ आणि २२ डिसेंबरला झी
मराठीवरून होईल.