आजच्या तरूणाईच्या जगण्याचा आगळावेगळा फंडा सांगणारी आणि अल्पावधीतच सर्वांच्या आवडीची बनलेली मालिका म्हणजे झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी. मुंबई शहरात राहणा-या आणि वैयक्तिक आयुष्यासोबतच करिअरमध्येही स्ट्रगल करणा-या सहा दोस्तांची ही कथा सध्या प्रेक्षकांना खूप भावतेय. प्रत्येक भागागणिक यातील दोस्तांची दोस्ती जशी घट्ट होतेय तसतसे मालिकेबरोबर प्रेक्षकांचे नाते अधिक दृढ होतेय. सुजय, आशु, मीनल, अॅना, कैवल्य आणि रेश्मा या प्रत्येक पात्राशी प्रेक्षकाचं एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. अशा या सहा दोस्तांच्या गोष्टीमध्ये आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. हा पाहुणा तसा दुनियादारी करण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. त्याने केलेल्या दुनियादारीला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुन घेतले होते आता हा पाहूणा म्हणजेच लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता या मालिकेत काही भागांमध्ये दिसणार आहे. येत्या १ ते ३ जून दरम्यान रात्री १०.३० वा. स्वप्नील या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘दिल दोस्ती दुनियादारी’त एकाच घरात राहणा-या सहा बिलंदर पात्रांमध्ये सर्वात डॅशिंग आहे ती मीनल. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन या शहरात आलेली मीनल सध्या या क्षेत्रात स्ट्रगल करतेय. आपल्याला कधी तरी एक चांगला मोठा रोल मिळेल आणि आपण यशस्वी अभिनेत्री बनू अशी आशा ती मनाशी बाळगून आहे. तिचं हे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ‘माजघरा’तील दोस्तही तिला कायम मदत करत असतात. मोठा रोल मिळेपर्यंत छोट्या छोट्या भूमिकांमध्येही समाधान मानणारी मीनल अशाच एका भूमिकेसाठी एका चित्रपटाच्या सेटवर जाते आणि त्या चित्रपटाचा अभिनेता स्वप्नील जोशी आहे हे तिला कळतं. स्वप्नीलची खूप मोठी फॅन असलेल्या मीनलला स्वप्नीलसोबत छोटीशी का होईना भूमिका करायला मिळते हा विचारच सुखावून जातो. चित्रीकरणाच्या तयारीच्या दरम्यान अनेक अजब गोष्टी, धम्माल गमंती जमती, किस्से या दरम्यान घडतात आणि हे प्रसंग सहाही मित्रांच्या आयुष्यात धमाल घडवून जातात. ही सगळी धमाल रसिकांना येत्या काही भागांत अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्राचा लोकप्रिय नायक आणि ‘लव्हर बॉय’ अशी इमेज असलेला स्वप्नील जोशी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधून काय धम्माल करेल हे बघणं त्याच्या फॅन्ससाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. येत्या १ ते ३ जून दरम्यान रात्री १०.३० वा. ‘दिल दोस्ती दुनियादारीचे’ हे विशेष भाग झी मराठीवरून प्रसारित होतील.