मुंबई – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (वय 75) यांचे शनिवारी मध्यरात्री 12 वाजता येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना मंगळवारी येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज दुपारनंतर त्यांची प्रकृती जास्त खालावली. रात्री उशिरा सर्व अवयव निकामी झाल्यामुळे 12.01 वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रविवारी (ता. 7) सकाळी 9 वाजता श्रीरामपूर येथील आझाद मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अशोकनगर येथे त्यांच्यावर दुपारी 2 ते 4 या वेळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी पुष्पलता, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष असलेले चिरंजीव अविनाश तसेच सुजाता, अनुराधा व अंजली या मुली तसेच ज्येष्ठ बंधू केशवराव असा परिवार आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री बॅरीस्टर रामराव आदिक यांचे ते कनिष्ठ बंधू होत. आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवलेले आदिक 45 वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. गेल्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. विधी शाखेचे ते पदवीधर होते. आदिक यांनी 1966 ते 1970 च्या दरम्यान त्यांनी येथील न्यायालयात वकीली केली. येथील महाविद्यालयात काही काळ ते कायद्याचे प्राध्यापक होते. वकीली सुरु असताना ते तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस झाले. तेथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरु झाला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. पुलोद सरकारच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे ते साथीदार होते. राजकारणात पक्षसंघटनेत त्यांनी विविध पदे भुषविली. नगर जिल्हा कॉंग्रेस सोशालीस्ट फोरमचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीरामपूरातून दोनदा तर वैजापूरातून एकदा ते आमदार म्हणून निवडून आले. विधानपरिषद व राज्यसभेवर प्रत्येकी दोनदा निवड झाली. पुलोद सरकारमध्ये 1978 ते 1979 या कालावधीत ते पाटबंधारे, विधी, माहिती व जनसंपर्क खात्याचे मंत्री होते. 1989 ते 1992 पर्यंत परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तर 2003 ते 2004 या कालावधीत कृषी व विधी खात्याचे मंत्री होते. मुळा प्रवरा विजसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. सात वर्षे अशोक साखर कारखान्याची सुत्रे त्यांच्याकडे होती कामगार चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते राष्ट्रीय साखर कामगार फेड़रेशनचे 1995 पासून अध्यक्ष होते. इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद व नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी होते. शेतमजूरांच्या ट्रेड युनियनची त्यांनी राज्यात पहिली नोंदणी केली. कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. राष्ट्रीय किसान सभेचे ते अध्यक्ष होते. शेतकरी व शेतमजूरांच्या प्रश्नासाठी त्यांनी राज्यभर संघटन उभे केले.