धुळे – होय आम्ही विदर्भ स्वतंत्र राज्य करणार , २० वर्षापासून विदर्भ स्वतंत्र राज्य करणे हा भाजपचा अजेंडाच आहे असे तीन -चार दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मी जोपर्यंत दिल्लीत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होवू देणार नाही अशी गर्जना केली आहे . ते म्हणाले ,या निवडणुकीत काँग्रेस नेते खोट्या अफवा पसरत आहेत. पण ते साठ वर्षे एवढे खोटे बोलले की, लोकांना आता ते पटत नाही. कापूस, कांदा या मुद्यावरून खोट्या अफवा पसर वतात. सध्या त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे होणार, मुंबई पळवणार अशा अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. त्याच प्रमाणे महाराष्ट्र मुंबई शिवाय अधुरी आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या रणधुमाळीतील अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळ्यातील शिंदखेडा येथील दोंडाईचा येथे घेतलेल्या प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
ते म्हणाले , मी येथे आलो होतो. तुम्ही मला दोन्ही खासदार विजयी करून माझ्या शब्दाचा मान ठेवला. चार महिन्यात मी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. प्रचार सभांत काहीही बोलायचे आणि विसरायचे हा नेत्यांचा स्वभाव असतो. पण मी नेता नाही. मी तुमचा सेवक आहे. मी देशाचा प्रधानसेवक आहे. त्यामुळे वचने विसरण्यासाठी नव्हे तर त्यांची आठवण परत करून देण्यासाठी मी आलो आहे. त्यामुळे मी आपल्याला वचन देतो. ज्यावेळी आमचे 60 महिने पूर्ण होतील त्यावेळी प्रत्येक गोष्टीचा हिशेब देईल.
आम्ही खोटे बोलण्यासाठी वचने दिलेली नाही. तर आम्ही विकासासाठी वचने दिली आहेत. विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धुळे, नंदूरबारला आम्ही मुख्य प्रवाहात आणू. मी लहानपणापासून कांदा खात आलो आहे. त्यामुळे लहानपणापासून आम्हाला कांदा खाऊ घालणा-यांना आम्ही निराश करणार नाही. आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर लगेचच राज्य आणि केंद्रातील सरकार मिळून कांदा उत्पादक शेतक-याच्या सर्व समस्या आम्ही दूर करू.
आम्ही काँग्रेसप्रमाणे खोटी आश्वासने देणारे नाही. काँग्रेसने प्रत्येकवेळी रेल्वे लाईन बाबत किती आश्वासने दिली. मनमाड इंदूर लाईनची एवढी जुनी मागणी असूनही केवळ आश्वासने दिली आहेत. साठ वर्षे पंचायतींपासून केंद्रापर्यंत त्यांचेच राज्य होते. त्यांनी कोणतीही वचने पाळली नाही. कामाचा हिशेब दिला नाही. पण आता ते मला हिशेब मागत आहेत. पण त्यांनी देऊ अथवा नाही पण मी तुम्हाला प्रत्येक पैशाचा हिशेब देईल हे माझे वचन आहे.असे ते म्हणाले