अलिकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत जरी नवनवीन प्रयोगांना वेग आला असला तरी आजवर मराठीत अभावानेच पाहायला मिळणारा थरार ‘जीत’ या आगामी चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. एकेकाळी मराठी चित्रपट कुस्तीच्या रंगात रंगलेला पाहायला मिळायचा. स्थल कालपरत्वे मराठी चित्रपट कात टाकत असून कधीही न दिसलेली सायकल रेस ‘जीत’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
प्रीतपाल सिंग शेरगील निर्मितव वाईल्ड रोझ फिल्मची प्रस्तुती असलेल्या ‘जीत’ चित्रपटात कथानकाच्या मागणीनुसार एका सायकलचॅम्पियनशिपचंचित्रीकरण करण्यात आलं आहे. पुण्यातील भंडारा घाटामध्ये चित्रित झालेली ही सायकल रेसउत्कंठावर्धक आणि थरारक बनली आहे. यानिमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटात निसर्गरम्य तरीही अवघड अशा भंडारा घाटाचा समावेश करण्यात आल्यामुळे एका नवीन लोकेशनमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधीप्रेक्षकांना मिळणार आहे.
‘जीत’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधान आणि सचिन दाणाई यांच्यावर ही सायकल रेस चित्रीत करण्यात आली. या रेसमध्ये राज्यस्तरीय सायकल रेसर्सनी सहभाग घेतल्याने यातील रोमांच अधिक वाढला आहे. एकीकडे एक्स्पर्ट सायकल रेसर तर दुसरीकडे पडद्यावर अभिनय करणारे कलाकार… तीव्र चढ-उतार असलेला निमुळता रस्ता… एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी… पावसाच्या वातावरणामुळे निसरडा झालेला रस्ता… अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी… अशा प्रतिकूल वातावरणात या वेगवान रेसचं चित्रीकरण करण्यात आल्याने ही रेस अधिकच रोमहर्षक बनली आहे. या रेससाठी ‘जीत’चे दिग्दर्शक सागर चव्हाण आणि कॅमेरामन मनोज शॉ यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.
बॉलिवुडमध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात प्रेक्षकांना सायकल रेसचा थरार अनुभवता आला होता. ‘जीत’मधील सायकल रेसही त्याच ताकदीची बनली असल्याचं मत व्यक्त करत भूषण म्हणाला, ”अविस्मरणीय… चित्तथरारक… रोमहर्षक… उत्कंठावर्धक… ही सर्व विशेषणं या रेसला देता येतील. रेस सायकलची असल्याने विशेष काळजी घ्यावी लागली. रेसचं चित्रीकरण घाटात करण्यात येणार असल्याने मनात थोडी भीती होती. या रेसमध्ये सहभागी झालेल्या रेसर्सची खूप मदत झाली. वळणावळणाच्या नागमोडी आणि निमुळत्या रस्त्यावर सायकलच्या गतीवर नियंत्रण राखणं हे मोठं दिव्य होतं. ते दिव्यही पार पाडलं आणि हा अनुभव बरंच काही शिकवून गेला.भंडारा घाटातील चित्रीकरणानंतर ‘जीत’मधील सायकल रेसमधील पुढील भागाचं चित्रीकरण पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे.
समाजातील फसवेगिरी, ढोंगीपणा, हतबलता आणि सामाजिक पातळीवर पसरलेली उदासीनता यावर या चित्रपटाद्वारे प्रहार करण्यात आला आहे. पैसा आणि सत्तेच्या बळावर आपण काहीही करू शकतो ही धारणा नष्ट करून त्याला मूठमाती देण्याचा प्रयत्न ‘जीत’मध्ये करण्यात येणार आहे. मंजुश्री गोखले यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथा मंजुश्री आणि सागर चव्हाण यांनी लिहिली आहे. भूषण आणि सचिनसोबत या चित्रपटात सयाजी शिंदे, त्रिशला शहा, शरद पोंक्षे, मनोज जोशी, विलास उजवणे, अंजली उजवणे, वरुण गुलाटी यांच्या अभिनयाने सजलेला ‘जीत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.