मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या विविध भूमिकांद्वारे लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे आशालता वाबगावकर. मराठी संगीत नाटकातून केवळ अभिनयच नाही तर गायकीतून आणि चित्रपटांमधील अनेकविध भूमिकांमधून आशालताताईंनी अमाप लोकप्रियता मिळवली. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान असणा-या आशालताताईंच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील “जावई विकत घेणे आहे” या लोकप्रिय मालिकेमधून. या मालिकेत त्या वीणा प्रधान म्हणजेच सविता प्रभुणेच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.
राया आणि प्रांजलच्या सुखी संसारात कायम खोडा घालण्याचं काम वीणा प्रधान करतात. रायाने आपला घरजावई बनावं आणि प्रांजलने कायम आपल्याकडेच रहावं या हट्टापायी त्या कायम नवनवीन डावपेच आखतात. यात त्या कधी यशस्वी होतात तर कधी त्यांना माघारही घ्यावी लागते. या सर्व गोष्टींचा त्रास प्रांजल , रायाला आणि त्याच्या कुटुंबियांनाही होतोय पण वीणा प्रधानला मात्र त्या गोष्टींची पर्वा नाहीये. आपल्या आईच्या या विचीत्र हट्टामुळे प्रांजलही वैतागुन गेली आहे. रायाही या समस्येवर कसा मार्ग काढता येईल या विचारात आहे पण त्याचेही प्रयत्न तोकडे पडत आहेत. या परिस्थितीत आता रायाच्या मदतीला येणार आहे त्याची आजीसासू म्हणजेच वीणा प्रधानची आई. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर ही भूमिका साकारत असून यात त्या वीणा प्रधानला आपला करारी बाणा दाखवणार आहेत.
या मालिकेच्या माध्यमातून आशालताताई खूप वर्षांनतर टीव्हीच्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या भूमिकेसाठी सर्वात आधी आशालताताईंचाच विचार मनात आला आणि या भूमिकेसाठी त्यांना विचारले असता त्यांनीही लगेच होकार कळवला अशी माहिती मालिकेच्या निर्मात्यांनी दिली. पुढील आठवड्यात त्यांची मालिकेत एन्ट्री होणार असून मालिकेला एक नवीन वळणही मिळणार आहे. आपल्या आवडीच्या अभिनेत्रीच्या या नव्या भूमिकेसाठी बघा ‘जावई विकत घेणे आहे’ दर सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वा. झी मराठीवर.