पुणे – ‘जात, पैसा आणि गुन्हेगारी हेच राजकारण झाले आहे. लोकांना हे बदलायचे आहे, जातीपातीचे बंध तोडायचे आहेत. परंतु, राजकारण्यांना हा बदल घडू द्यायचा नाही. गरिबांसाठी काम करणे हेच खरे राजकारण. आपल्या संस्कृतीचे ते तत्त्वज्ञान आहे, तेच जैन समाज करीत आहे,‘‘ असे गौरवोद्गार काढताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टीका केली.
बालेवाडी- म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित “भारतीय जैन संघठन‘च्या राष्ट्रीय अधिवेशात ते बोलत होते. संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, खासदार अनिल शिरोळे, दिलीप गांधी, संजय काका पाटील, आमदार चैनसुख संचेती, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख आदी या वेळी उपस्थित होते. पुणे व अन्य जिल्ह्यांतील नवनिर्वाचित आमदारांचा या वेळी गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गडकरी म्हणाले, “”शरीरावर शस्त्रक्रिया करायची तेव्हा चांगला डॉक्टर लागतो. निवडणूक आली की मात्र जातीचाच कोणी पाहिजे; परंतु कोणताही राजकारणी त्याच्या जातीचा उद्धार करीत नाही, असे माझे ठाम मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी अशा राजकारणाला छेद दिला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये आम्हाला सवर्णांच्या जातीचे “कार्ड‘ही वापरता आले असते; परंतु आम्ही तसे केले नाही, कारण आम्ही जातपात मानत नाही.‘आपल्याकडे गरिबी, कुपोषण या समस्या अजूनही आहेत. देश “धनवान‘; पण जनता गरीब आहे, कारण चांगले काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. राजकारणीही समाजकारणाकडे दुर्लक्ष करतात. संघटनेच्या माध्यमातून तुम्ही केवळ जैनांसाठी नव्हे; तर अन्यही शोषित, पीडित समाजासाठी काम करीत आहात. धर्माची शिकवण सत्यात आणत आहात, या भावनेतून काम करीत राहिलात, तर समाज आणि देश बदलेल.‘‘
मुथा म्हणाले, ‘देशात चांगला बदल घडविण्याची क्षमता जैन समाजात आहे. आम्ही सेवा करण्यासाठी नेहमी पुढे असतो. गुजरात, किल्लारी, अंदमान यांसह विविध ठिकाणी उद्ध्वस्त झालेला प्रदेश पुन्हा उभा करण्याचे, शाळा उभारणीचे काम संघटनेने केले. मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी पुण्यात आणून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण देण्याचे काम केले. सरकारकडून शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने मूल्य शिक्षण आणि शाळा दर्जा सुधार कार्यक्रम संघटनेने सुरू केला आहे, ते “मोड्यूल‘ राष्ट्रनिर्माणासाठी देशातील सर्व राज्यांना देणार आहे.‘‘