जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने भव्य जनजागृती अभियानाचे आयोजन
पुणे :
ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त भव्य जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 29 मे रोजी या अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. अशी माहिती ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सायली कुलकर्णी व आयोजक प्रसाद कुलकर्णी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने महिला व युवक कल्याण, कला, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात आणि विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणार्या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाला निमंत्रण देणार्या तंबाखू/ गुटखा/ सुपारीच्या सवयींचा तत्काळ त्याग करा व सुदृढ आनंदी जीवन जगा असा संदेश या अभियानाद्वारे महाराष्ट्रभर देण्यात येणार आहे. यावेळी तंबाखूविरोधी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे तसेच स्वाक्षरी अभियानही घेतले जाणार आहे.
या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘जय मल्हार’ मधील खंडोबा ची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे , स्टार प्रवाह वरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ची भूमिका करणारी कलाकार जुई गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानासाठी कार्यरत असणार्या मान्यवरांचा व तंबाखूसेवनामुळे पिडित असलेल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणार्या वैद्यकीय कर्मचार्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त महाराष्ट्र संकल्पनेतून आयोजित आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार असून, त्यांच्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या अभियानात नागरीक,विद्यार्थी, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, आणि ढोल-ताशा पथकांनीही सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.सायली कुलकर्णी यांनी केले.