जळगाव- शहरातील समता नगर परिसरात एका टेकडीवर 9 वर्षीय चिमुरडीचा अर्धनग्नावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिमुरडीचा मृतदेह एका पोत्यात सापडला आहे. मृतदेहावर नखांनी ओरबड्याच्या खुणा आहेत. त्यामुळे चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,समता नगरातील धामणगाव वाड्यात सदर मुलगी राहात होती. काल (मंगळवार) संध्याकाळपासून ती बेपत्ता होती. तिचे आई-वडिलांसह नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. रामानंदनगर पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी देखील मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी आढळून आली नाही.
टेकडीवर पोत्यात सापडला मृतदेह…
घरासमोरील उंच टेकडीवर आज (बुधवार) एका पोत्यात मुलीचा मृतदेह सापडला. बकर्या चारणार्या महिलेला एका पोत्याजवळ काही कुत्रे दिसली. तिने जवळ जाऊन पाहिले असता तिला मुलीला पाय दिसला. तिने ही माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मुलीच्या आई-वडिलांसह पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मुलीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आहे. तसेत मृतदेहावर नखांनी ओरबड्याच्या जखमा आहेत. त्यामुळे मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोत्यात सापडली माचिस..
चिमुरडीच्या मृतदेहासोबत पोत्यात एक माचिस सापडली आहे. त्यामुळे मुलीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकर्याचा प्रयत्न होता असेही पोलिसांनी सांगितले आहे.
भोंदूबाबावर संशय..?
मुलीच्या घराशेजारी एक भोंदूबाबा राहातो. तो देखील मंगळवारी रात्री नऊ वाजेपासून बेपत्ता आहे. त्याचा मोबाइलही बंद येत आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.