जयललितांना जामीन मंजूर झाल्याने तामिळनाडूत जल्लोषाचे वातावरण आहे. सगळीकडे आनंद साजरा केला जात आहे. समर्थक ठिकठिकाणी पेढे, मिठाईचे वाटप करत आहेत. एआईएडीएमके पक्षाचा आज 43 वा वर्धापन दिन आहे. याच मुहूर्तावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत जयललिताना दिलासा मिळाला आहे. जयललिता यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जयललिता यांना चेन्नईला जाता येणार आहे. जयललिता यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे.
जयललिता 27 सप्टेंबरपासून बेंगळुरू येथील मध्यवर्ती कारागृहात होत्या. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. त्या प्रकरणी जयललिता यांनी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर जयललितांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी जामीनाची मागणी केली होती. जयललिता यांनी त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज असे आजार असल्याचे सांगितले होते.
जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याचे विचारात घेत जयललितांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यांना घरात उपचार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना 18 डिसेंबरपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही. कर्नाटक हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. अद्याप ही शिक्षा रद्द करण्यात आलेली नाही. तसेच जयललिता यांच्या वकिलांना कोर्टाला आश्वासन दिले आहे की जयललिता पक्षातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती करतील, अशी माहिती भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निकालानंतर दिली.