मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. राज्यात आर्थिक-सामाजिक विकासास पोषक ठरणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येत आहे.
या विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळविणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत. 120 वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून गेल्या वीस वर्षांत आतापर्यंत ती फक्त दहा लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे.
या मानद डॉक्टरेटसाठी मानकऱ्यांची निवड करताना नियमित डॉक्टरेटपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण निकष लावले जातात. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीला पूरक ठरणारी विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कर्तबगारी दाखविणाऱ्या विद्वतजनांसोबतच समाजात सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी अनुकूल असे परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींनाही या पदवीने सन्मानित करता येते. 1996 नंतर या विद्यापीठातर्फे डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आलेल्या दहा मान्यवरांमधील केवळ दोन मान्यवरांना या निकषांवर सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची याच निकषावर डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आली आहे.
श्री. फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे स्विकारल्यानंतर वर्षभराच्या आतच राज्यात विविध आघाड्यांवर सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू पहात आहे. या मोहिमेत येत असलेल्या असंख्य अडथळ्यावर मात करून श्री. फडणवीस करीत असलेल्या प्रयत्नांचाही विद्यापीठाने प्रशंसापूर्वक उल्लेख केला आहे. या पदवीसाठी संबंधित मानकऱ्यांचा ओसाका सिटी विद्यापीठ अथवा ओसाका शहराशी वैशिष्ट्यपूर्ण संबंध अपेक्षित असतो. पश्चिम जपानमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा कन्साई प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या ओसाकाची मुंबई शहराशी औद्योगिक क्षेत्रात भागीदारी (Business Partnership City)आहे. श्री. फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात पार पडलेल्या आपल्या जपान दौऱ्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक चर्चासत्राचे उद्घाटन करण्यासाठी ओसाका शहराला भेट दिली होती आणि या शहराशी विविध पातळ्यांवर असलेला महाराष्ट्राचा ऋणानुबंध अधिक दृढ केला होता.
श्री. फडणवीस यांनी भविष्यात विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थी आणि ओसाकाच्या नागरिकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षाही विद्यापीठाने व्यक्त केली आहे.