अमरावती : जगामध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात यशाची पताका फडकावित आहे. अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रात मराठी माणसाचे यश आपल्याला मराठीपणाचा अभिमान देत आहे. जग समृद्ध करणाऱ्या मराठी माणसाला राज्यात विविध क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. राज्याची ही दालने जगातल्या मराठी माणसासाठी सदैव खुली आहेत. त्यामुळे निश्चितच भविष्यात राज्य अशा व्यक्तीमत्वांच्या सहकार्याने समृद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जागतिक मराठी अकादमीच्यावतीने ‘शोध मराठी मनाचा संमेलन 2016’ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, रवी राणा, डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदेले, वीरेंद्र जगताप, आमदार यशोमतीताई ठाकूर, महापौर श्रीमती रिना नंदा, मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उपाध्यक्ष गिरीष गांधी, डॉ. विजय जोशी, गायिका वैशाली माडे, केसरी पाटील, मंदार जोगळेकर, किशोर रांगणीकर, दीपक गेडा, सतीष राणे, मोहन गोरे, माजी आमदार बी. टी देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, बबलू देशमुख आदी उपस्थित होते.
शोध मराठी मनाचा संमेलन अमरावतीकरांसाठी पर्वणी असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, अशा संमेलनांमधून तळागाळातून पुढे आलेल्या व्यक्तीमत्वांचे विचार उलगडतात. युवा पिढीने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. समाजात एकेका क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या भरवशावर देश चालत असतो. अशा व्यक्तीमत्वांचा उलगडा संमेलनाच्या माध्यमातून होत असतो. तळागाळातील लोकांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांना वाव मिळत नाही. अशा व्यक्तींमधील गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शासन करीत आहे. ही मंडळी समाजाची ऐनकेन प्रकारे सेवाच करीत असतात.
भौतिक प्रगती झपाट्याने होत आहे. या प्रगतीमध्ये माणुसकी जपल्या गेली पाहिजे. भौतिक प्रगतीपेक्षा त्या देशाची, राज्याची बौद्धिक प्रगती किती आहे हे महत्त्वाचे ठरते. भौतिक संपदेपेक्षा बौद्धिक संपदा आवश्यक आहे. अशा राज्यातच निरपेक्ष, निकोप स्पर्धा वाढीस लागून सर्वसमावेशक प्रगती होत असते. तळागाळातून आलेले अनेक व्यक्तीमत्व समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या बळावर प्रगती करीत असतात. त्यामध्ये मराठी माणसांचा टक्का निश्चितच जास्त आहे. जगात मराठी माणूस अनेक क्षेत्रात मोठी जबाबदारी घेऊन काम करीत आहे. याचा राज्याला अभिमान आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
श्री. शिंदे म्हणाले, जगात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मराठी माणसांना एकसंघ ठेवण्याचे व दाखविण्याचे काम मराठी अकादमीने केले आहे. मराठी अकादमीची ही संमेलने म्हणजे चळवळच आहे. ही चळवळ अशीच सातत्याने पुढे सुरू राहिली पाहिजे.
श्री. पोटे म्हणाले, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी आहे. मराठीचा अभिमान त्याला असला पाहिजे. मराठी अकादमीने सुरू केलेला हा उपक्रम मराठीला आणखी उच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.
कार्यक्रमप्रसंगी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मराठी तरूणाने जगात कुठेही उभे राहण्याची क्षमता विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान गायिका वैशाली माडे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर व शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचलन सोमेश्वर पुसदकर यांनी तर आभार प्रदर्शन निशान गांधी यांनी केले.