महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या झी गौरव पुरस्कारांत सर्वात महत्त्वाचे स्थान असते ते झी जीवनगौरव पुरस्कारांचे. मराठी चित्रपट, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या ज्येष्ठ आणि मान्यवर कलावंताना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी होणा-या झी गौरव पुरस्कारामध्ये आपल्या ठसकेदार आवाजाने गाण्यांमध्ये विशेषतः लावणीमध्ये रंगत आणणा-या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना यावर्षीचा चित्र जीवन गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना नाट्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामध्ये सिंहाचा वाटा आहे तो तमाशाप्रधान चित्रपटांचा आणि या चित्रपटांच्या लोकप्रियतेमध्ये महत्वाचं योगदान आहे ते सुलोचना चव्हाण यांचं. वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणा-या सुलोचनाबाईंनी आपल्या ठसकेबाज आवाजात एकाहून एक फक्कड लावण्या देत मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. लावण्यांबरोबर हिंदी चित्रपट कीते, ऊर्दू गजल गायनाने सुलोचनाबाईंनी आपल्या आवाजाची मोहिनी अनेक रसिकांवर घातली. त्यांच्या आवाजाची जादू केवळ राज्य किंवा देशापुरतीच मर्यादित नाही राहिली तर तिची ख्याती परदेशातही पोचली आणि तिकडेही त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो पाकिस्तानचा कारण या देशातही सुलोचनाबाईंच्या आवाजावर प्रेम करणारे हजारो श्रोते आहेत. ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’, “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा”, “सोळावं वरीस धोक्याचं”, “तुझ्या उसाला लागंल कोल्हा” अशा एक ना अनेक लावण्यांनी आपल्या रसिकांना घायाळ करणा-या सुलोचनाबाईंनी आपलं अवघं आयुष्य या कलेला समर्पित केलं. लावणी सोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. कित्येक शाळा, महाविद्यालये, वाचनालये, दवाखाने यांच्या मदतीसाठी मानधन न घेता त्यांनी कार्यक्रम केले आणि मिळालेले पैसे देणगी म्हणून दिले. कलेसोबतच सामाजिक भानही जपणा-या या लावणी सम्राज्ञीच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून यावर्षीचा चित्र जीवन गौरव पुरस्कार त्यांना बहाल करण्यात येत आहे.
मराठी नाट्यलिखाणामध्ये स्वतःची वेगळी शैली निर्माण करत नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार. नाटक या माध्यमामध्ये किती कमालीची ताकद असते याची प्रचिती त्यांच्या नाटकांमधून येते. ‘आत्मकथा’, ‘गार्बो’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘यातनाघर’, ‘युगान्त’, ‘रक्तपुरूष’ अशा एकाहून एक सरस नाटकांमधून त्यांनी मानवी प्रवृत्तींचे विविध कंगोरे मांडले. त्यांच्या या नाटकांचे रसिक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले या कौतुकाबरोबरच अनेक मानाच्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले.
त्यांच्या ‘त्रिधारा’या नाट्यप्रकाराने मराठी नाटकांना जागतीक पातळीवर एक नवा आयाम प्राप्त करून दिला. त्यांची बरीच नाटके ही इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतरीत झाली हे विशेष. आपल्या प्रतिभावान लेखणीने मराठी नाटकांना वेगळ्या उंचीवर नेणा-या या नाटककाराला मानाचा सलाम करत यावर्षीचा झी नाट्य जीवनगौरव त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षीपासून झी गौरव पुरस्काराचे झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव असे दोन वेगवेगळे पुरस्कार सोहळे होत आहेत. यातील १३ मार्चला पार पडणा-या चित्रगौरव पुरस्कारामध्ये सुलोचनाताई चव्हाण यांना जीवनगौरव प्रदान करण्यात येणार आहे तर २६ मार्चला होणा-या नाट्यगौरव पुरस्कारात महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.