पुणे-चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज धरणीधर देव (वय 63) यांनी मंगलमूर्ती वाड्यातील त्यांच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्यापि स्पष्ट होऊ शकलेले नाही.त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि दोन नाती असा परिवार आहे.
सुरेंद्र महाराजांवर काही महिन्यांपूर्वी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर जाहीर कार्यक्रमांतील त्यांचा सहभाग कमी झाला होता. नुकत्याच झालेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेतला होता. काल रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते त्यांच्या खोलीत एकटेच झोपले होते. सकाळी त्यांचा एक विद्यार्थी सकाळी सहा वाजता पूजेसाठी त्यांना उठवायला गेला होता, मात्र दार वाजवूनही त्यांनी उघडले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यानेच मंगलमूर्तींची पूजा केली. सकाळी नऊ वाजले तरी महाराज बाहेर न आल्याने त्यांचा मुलगा दर्शन याने त्यांच्या खोलीत पाहिले तर त्या ठिकाणी ते नव्हते. वरच्या मजल्यावर त्यांच्या अभ्यासिका व व्यायामाच्या खोलीचे दार बंद असल्याचे लक्षात आले. कडी वाजवूनही दार न उघडल्याने अखेर दार तोडण्यात आले. त्यावेळी खोलीत गळफासाला लटकलेला महाराजांचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पार्थिव शवविच्छेदनासाठी चव्हाण रुग्णालयात पाठवून दिले. आत्महत्येमागील कारणाचा पोलीस तपास करीत आहेत.
सुरेंद्र महाराज यांचे इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण झाले होते. टाटा इंजिनीअरींग अॅण्ड लोकोमोटिव कंपनी लिमिटेड(टेल्को)मध्ये संगणक विभागात ते 22 वर्षे सेवेत होते.सुरेंद्र महाराज यांचे राजकीय कार्यही मोठे होते. जयप्रकाश आणि नानाजी देशमुख यांच्या समवेत अनेक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. सन 1992मध्ये ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर नगरसेवकपदी निवडून आले होते. सन 1992 ते 1997 या काळात महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते सभासद राहिले होते. सन 1994 मध्ये शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. तर सन 1997 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर स्वीकृती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. विविध सामाजिक मंडळाचे सभासद आणि अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांना खेळाचीही आवड होती. शालेय, महाविद्यालयीन तसेच टेल्को कंपनीमध्ये असताना ते उत्तम क्रिकेटपटू म्हणून परिचीत होते. याशिवाय विविध नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.1 मे 2001 पासून चिंचवड देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी पट्टाधिकारी तथा मुख्य विश्वस्त पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. या कालावधीत त्यांनी देवस्थानच्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली असणा-या मंदिर-परिसरात भक्तगणांसाठी अनेक सोयी सुविधा केल्या. अल्प दरात भोजन प्रसादाची सोयही केली. 1 मे 2011 पासून चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पट्टाधिकारी तथा मुख्य विश्वस्तपदावर 10 वर्षांकरिता त्यांची पुन्हा नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांचा संजीवनसमाधी सोहळा महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यास सुरूवात केली.सुरेंद्र देव महाराज यांच्या मृत्यूची माहिती कळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे गजानन चिंचवडे यांच्या सह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी वायसीएम रूग्णालयात धाव घेतली. सुरेंद्र महाराज देव हे 2001 सालापासून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदावर कार्यरत होते. अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकची मंदिरे देखील या देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली येतात. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे काम लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सुरेंद्रमहाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. मोरया गोसावींवरील दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. चिंचवड देवस्थानची वेबसाईट तयार करून त्यांनी अत्याधुनिक माध्यमातून ट्रस्टचे काम समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.