बंदुकीच्या गोळीने माणूस मारता येतो; त्याचे विचार नाही.. महात्मा गांधींच्या हत्येपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येपर्यंतच्या घटना बघितल्या तर वरील वाक्याची प्रचिती येते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सारख्या पुरोगामी विचारसरणीच्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणा-या हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. दाभोलकरांची तीन वर्षांपूर्वी पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली त्यांच्या मारेक-यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक शिक्षा करावी यासाठी विविध स्तरांतून उत्स्फूर्तपणे आंदोलनेही झाली. तीन वर्षांनंतरही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात आपल्या सरकारी यंत्रणेला अजून यश आलेले नाही. मात्र यामुळे अंनिसचे कार्यकर्ते खचले नाहीत याउलट ते अधिक जोमाने आपल्या जनजागृतीच्या कार्याचा गाडा पुढे रेटत आहेत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या उक्तीचा अनुभव घेत पुढे चाललेल्या या चळवळीचं पुढचं पाऊल आहे ‘रिंगणनाट्य’. मारेकऱ्यांचा निषेध करणे, विवेकी विचारासाठी लोकांना प्रवृत्त करणे यासाठी जे वेगवेगळे मार्ग कार्यकर्त्यांनी निवडले त्यापैकी एक प्रभावी मार्ग म्हणजे रिंगणनाट्य. या नाट्यचळवळीचा प्रचार अधिक जोमाने व्हावा आणि डॉ. दाभोलकरांना त्यांच्याच विचारांद्वारे आदरांजली वाहण्यासाठी झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर रिंगणनाट्यच्या सदस्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. यामध्ये रिंगणनाट्यची संकल्पना मांडणारे दिग्दर्शक अतुल पेठे , डॉ. दाभोलकरांचं कार्य नेटाने पुढे नेणारे त्यांचे चिरंजीव डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता दाभोलकर यांचा सहभाग असणार आहे. येत्या १८ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हा विशेष भाग झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील अं. नि. स. चे कार्यकर्ते आणि तरुण नाटकवेडे कलाकार यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. यामधून हा विचार नाटकरूपाने लोकांपर्यंत घेऊन जाण्याची इच्छा असलेले १६ गट तयार झाले. मुंबई, पुणे, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर ते पार शहद्यापर्यंतचे गट यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व बहुतेक तालुक्यांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाखा असल्याने हे गट तयार करणे तसेच नाटक बसल्यानंतर गावोगावी रिंगणनाट्याचे कार्यक्रम करणे हे त्यामुळे सुलभ झाले.
विविध गावांमध्ये विविध गटांद्वारे याचे प्रयोग होत आहेत. या पैकी इस्लामपूर येथील गटाने ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाट्य बसवले. पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये आणि अगदी दिल्लीमध्येही हा रिंगणनाट्याचे अनेक प्रयोग झाले आहेत. यातील एक छोटी नाटीका ‘चला हवा येऊ द्या’ मधून सादर होणार आहे. याशिवाय डॉ. हमीद आणि मुक्ता तसेच अतुल पेठे या नाट्यचळवळीची माहितीही देणार आहेत. येत्या मंगळवारी १८ ऑगस्टला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चा हा विशेष भाग प्रसारीत होणार आहे.