पुणे–
हेल्पलाइन, टोल फ्री क्रमांकानंतर आता फेसबुक वर येत आहे — अर्थात महापालिकेला आता नागरिकांच्या माऱ्याला सामोरे जाण्याची हौस आल्याचे स्पष्ट झाले आहे . एकीकडे पिवळ्या -काळ्या पट्ट्यांच्या रबरी स्पीडब्रेकर ने हैराण झालेल्या दुचाकीस्वारांचा संताप व्यक्त होत असताना त्याचे समर्थन करू पाहणाऱ्या महापालिकेला आता यावरून शिव्यांची लाखोली हि सहन करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही
महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व्यापक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने स्वतंत्र फेसबुक खाते उघडले असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. याबरोबरच पालिकेकडून ‘ई-न्यूज लेटर’ देखील प्रकाशित केले जाणार आहे.
गेल्या काही वर्षात प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषत: फेसबुक आणि व्हॉटस्अप चा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा फायदा घेत महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून फेसबुक खाते काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाशी कनेक्ट असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पालिका प्रशासनाने ‘पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ या नावाने खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महापालिकेचे नवीन प्रकल्प, नवीन उपक्रम, योजना तसेच प्रस्तावित धोरणांची माहिती दिली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरात सुरू असलेल्या कामांची, उपक्रमांची माहिती देखील फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिकेच्या कम्प्युटर आणि सांख्यिकी विभागाच्या वतीने हे काम पाहिले जाणार आहे.
पालिकेच्या कामाबद्दलच्या तक्रारी तसेच पालिकेबाबतचे आपले मत नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून थेट नोंदविता येणार आहे. यामुळे पालिकेशी संपर्क साधण्यासाठी शहरातील नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. फेसबुकवर करण्यात आलेल्या तक्रारी संबधित विभागांना पाठविण्यात येणार असल्याने तातडीने त्याची दखल घेतली जाणार आहे. पालिकेशी संबधित बातम्या आणि महत्त्वाचे निर्णय न्यूज लेटरच्या माध्यमातून नागरिकांना वाचता येणार आहे.