पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घुमान (पंजाब) येथे होणाऱ्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींची संख्या 1,400 पर्यंत गेली असून आणखी 900 जागांची नोंदणी करण्यासाठी येत्या 28 फेब्र्रूवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितली. विशेष महणजे या संमेलनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे या संमेलनासाठी अनेक नामवंत नाटय-चित्रपट क्षेत्रातील सेलेब्रिटीजनीही सहभागी होण्याचे मान्य केले आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
संमेलनाला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाडयांसाठी प्रवास तसेच घुमानमध्ये निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून 3,000 रुपये आकारण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या संमेलनासाठी या दोन रेल्वे गाडया अनुक्रमे मुंबईत वसईपासून तर दुसरी गाडी नाशिक रोड, नाशिक येथून 1 एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे बोगींना विविध दिवंगत साहित्यिकांची नावेही देण्यात येणार असून त्या त्या बोग्यांमध्ये त्या साहित्यिकाने लिहिलेले साहित्यही ठेवण्यात येणार असल्याचे संमेलनाध्यक्ष देसडला यांनी सांगितले.
निमंत्रित, पत्रकार आणि स्वयंसेवकांच्या 300 जागा वगळता विशेष रेल्वे प्रवासासाठी अजूनही 900 जागा शिल्लक आहेत, असे सांगून ते म्हणाले की, प्रतिनिधी नोंदणी व अधिक माहितीसाठी 9665 055 055 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यावा.
तसेच www.sahityasammelanghuman.org या संकेतस्थळावर प्रतिनिधी शुल्क भरण्याचा अर्ज उपलब्ध आहेत.
संमेलनासाठी येणाऱ्या सेलेब्रिटीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष मोहन जोशी, तसेच गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, संगीतकार राहुल घोरपडे, अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेत्री-नृत्यकार शर्वरी जेमेनिस, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, गायक त्यागराज खाडीलकर, उपेंद्र भट, अनुराधा कुबेर, अभिनेते संजय मोने, अश्विनी एकबोटे, भार्गवी चुरमुले, सुधीर गाडगीळ, वैभव जोशी, राजन पंडीत इत्यादींनीही संमेलनाला येण्याचे मान्य केले आहे.
संमेलनात सहभागी होण्यासाठी नांदेड येथून सचखंड एक्सप्रेसने 200 नागरिकांनी घुमान साहित्य संमेलनासाठी जाण्याचे निश्चित केले आहे, असे सांगून देसडला म्हणाले की, श्री संत शिरोमणी सावता महाराज साहित्य-कृषी दिंडीचे पंढरपूर ते घुमान आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीसाठी 350 साहित्य रसिकांनी नावनोंदणी केली आहे. तसेच इचलकरंजीवरून 250 साहित्य रसिकांनी संमेलनाला येण्याचे निश्चित केले आहे. नरसी नामदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोलीतून 100 साहित्य रसिकांनीही संमेलनाला येत असल्याचे कळवले आहे.
88व्या साहित्य संमेलनाचाच एक भाग म्हणून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयातून दोन लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रणे पाठविण्यात येत आहेत. तसेच राज्यातील सात हजार ग्रंथालयांना निमंत्रण पत्रेही यापूर्वीच धाडण्यात आली आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले.
‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचा शुभारंभ कवी संदीप खरे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे शुक्रवार, ता. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येत आहे. या उपक्रमात अनेक साहित्यिकांना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचे देसडला यांनी सांगितले.

