मुंबई :- राज्यातील सुमारे 1.75 कोटी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा
शुभारंभ मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि. 23 जून रोजी विधानभवन मुंबई येथे
करण्यात आला. या योजनेमुळे वार्षिक सुमारे 1300 दशलक्ष युनिटसच्या विजेची बचत होणार असून कमाल
मागणीच्या काळात सुमारे 500 मे.वॅ. विजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात
प्रतिबल्ब सुमारे 180 रुपयांची वीज बिलात बचत होणार आहे.
केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना जाहीर केली असून
या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महावितरणच्या भांडुप परिमंडलातील
ग्राहकांना प्रातिनिधीक तत्वावर मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले.
या योजनेमध्ये घरगुती ग्राहकांना प्रत्येकी 7 वॅट क्षमतेचे 2 ते 4 बल्ब देण्यात येतील. हे बल्ब रु. 100
रोखीने किंवा रु. 105 या दराने मासिक योजनेच्या हप्त्यानेही घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शुन्य
व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा वीज दरावर किंवा
महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही. तसेच तीन वर्षात मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी
राहणार आहे. केंद्र शासनाच्या EESL कंपनीद्वारे पारदर्शक निवीदा प्रक्रियेने बल्ब खरेदी करण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकास द्वारे व प्रत्यक्ष
कक्षावर भेटून या बल्बसाठी नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा
कार्यालय, बील भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यांत येतील.EESL
कंपनीमार्फत घरपोच सेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळया ठिकाणी स्थानिक
पातळीवरील लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने बल्ब वाटपाचे कार्यक्रम घेण्यांत येणार आहेत.
या कार्यक्रमास केंद्रीय विदयुत संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार श्री. किरीट सोमय्या,
आमदार श्री. राज पुरोहित, अप्पर मुख्य सचिव श्री. मिना, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. मुकेश खुल्लर,
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओम प्रकाश गुप्ता, संचालक (प्रकल्प) श्री. प्रभाकर शिंदे, संचालक
(संचालन) श्री. अभिजीत देशपांडे, EESL चे मानव संसाधन प्रमुख श्री. ए.के. अरोरा, प्रकल्प
व्यवस्थापक श्री. दिपक कोकाटे, व्यवस्थापक श्री. शरद चंद्र, रिलायन्स व टाटा कंपनीचे अधिकारी प्रामुख्याने
उपस्थित होते.