पुणे – राज्य घटनेने सामान्य नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माध्यमांबरोबरच लोकशाहीतील सर्व घटकांची आहे. सामान्य नागरिकांच्या या अधिकाराचे रक्षण करण्यात प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.
येथील त्रिदल संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यभूषण पुरस्कार समारंभात राष्ट्रपती श्री. मुखर्जी बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित समारंभात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. आर.ए. माशेलकर, पुण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेल्या अधिकारांचा कोणालाही संकोच करता येणार नाही. या अधिकार आणि हक्कांचे संरक्षण करण्याची लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहेच. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यांनी ती भूमिका अतिशय जबाबदारीने पार पाडावी. त्याचबरोबर लोकशाहीत संवादाची आवश्यकता भासते. प्रसारमाध्यमांनी सुसंवाद साधण्याची भूमिका पार पाडायला हवी.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, माझी बहुतांश कारकीर्द संसदेच्या आवारात गेली. अनेकवेळा माझ्यावर माध्यमांनी टीका केली. पण मी नेहमीच ती सकारात्मकरित्या घेतली. लोकशाहीत माध्यमांनी सुसंवाद साधण्यासाठी सेतूप्रमाणे काम करण्याची आवश्यकता आहे. माध्यमांनी अशा रीतीने काम केल्यास भारतीय लोकशाही आधिक सशक्त आणि मजबूत होईल. त्यामुळे लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या विविध यंत्रणा सक्षम होण्यास हातभार लागेल.पुणे स्वातंत्र्याच्या लढ्यात आघाडीवर असलेले शहर होते. या शहरातील अनेक सुपुत्रांनी स्वातंत्र्यांच्या लढ्यात अतुलनीय, असे योगदान दिले आहे. देशासाठी शहिद झालेले राजगुरू याच मातीतले होते. पुण्याने शिक्षण, उद्योग, समाजकारण, राजकारण, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. असा गौरवपूर्ण उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले की, ‘ प्रतापराव पवार यांचे व्यक्तिमत्व त्या प्रभावळीतील आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून पुण्याची परंपरा आधिक समर्थपणे पुढे नेली आहे. प्रतापराव पवार यांनी सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे. सकाळ माध्यमसमूह समाज सुधारणेच्या क्षेत्रात कशा पद्धतीने चांगले काम करून दाखवू शकतो हे प्रतापराव पवार यांनी आणि सकाळ समूहाने आपल्या कामातून दाखवून दिले आहे.’ माध्यमांनी त्यांच्या कामाचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिलेली शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिलेली कामांची पद्धती आजही अनुकरणीय आहे.
प्रतापराव पवारांचे काम आदर्शवत : फडणवीस
उद्योग तसच माध्यम क्षेत्रात प्रतापराव पवारांचं कार्य उल्लेखनीय आहे. समाजातील नव्या पिढीला उत्तेजन देण्यासाठी कांही व्यक्तिमत्व समाजासमोर दिसावीत या दृष्टीने पुण्यभूषण सारखे पुरस्कार महत्वाचे ठरतात. असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ स्वातंत्र्यपूर्व काळात माध्यमांची भूमिका समाज परिवर्तनाची होती. समाजात स्वातंत्र्य प्राप्तीचे स्फल्लींग चेतवण्याची होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज परिवर्तन व समाजात चांगल्या गोष्टी रुजविण्याकरिता माध्यमांनी भूमिका स्वीकारली प्रतापराव पवारांनी सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमांतून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवून आदर्शवत कार्य केले आहे. जलयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमास तनिष्क उपक्रमाच्या सहाय्याने सकाळ माध्यम समूहाने अत्यंत पथदर्शी अस कार्य केल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोलिवडे या ग्रामीण भागात जन्मलेल्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी आम्हाला शिक्षण देण्याचा पराकाष्ठेने प्रयत्न केला. अस सांगून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की, ‘मातोश्रींच्या सुयोग्य संस्कारामुळेच आम्हा सर्व भावंडाची सुयोग प्रगती होऊ शकली. जीवनातील विविध क्षेत्रात आम्ही यशस्वी होऊ शकलो. माझे बंधू प्रतापराव हे अभियांत्रिकी पदवीधर पण त्यांनी या क्षेत्रापेक्षा उद्योग, माध्यम व सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन कार्य करून आमच्या कुटुंबाचा अभिमान वृद्धीगंत केला आहे.सत्कारास उत्तर देताना प्रतापराव पवार म्हणाले की, ‘पुणे प्रगल्भ शहर आहे. सर्वांगीण विकासासाठी चांगल्या संस्थांची गरज असते. चांगल्या संस्था या विचारमंथनाद्वारे निर्माण होऊ शकतात. ते पुढे म्हणाले, ‘प्रश्नांचा केवळ उहापोह करण्यापेक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करायला हवेत. शहरात जनसेवा सारखी चांगली संस्था कार्यरत आहे. या संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते प्रतापराव पवार यांना शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, एक लक्ष रुपये व स्मृती चिन्ह देऊन पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक मालतीबाई दास्ताने, बाबुराव जंगम, विठ्ठल महाजन, दुर्गातंत गायतोंडे, शंकरराव होडरकर यांचाही मानपत्र देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्रिदल संस्थेचे अध्यक्ष संतोष देसाई यांनी प्रास्ताविक केले तर पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आभार मानले.समारंभास खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अंकुशराव काकडे, जब्बार पटेल, अभिजित पवार तसेच पवार कुटुंबिय व नागरिक उपस्थित होते.