दूध पावडर, खाद्यतेल मिश्रित भेसळयुक्त असणारी ‘स्पेशल बर्फी’ नावाने ओळखली जाणारी गुजरातची बर्फी जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दुपारी केली. सुमारे सात लाख ८६ हजार ५६० रुपये किमतीची पाच हजार किलोची बर्फी जप्त करण्यात आली आहे. एफडीएचे पुणे विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दिलीप संगत, अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री निकम, योगेश डहाणे, बाळासाहेब कोतकर यांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या.दरम्यान दिवाळीच्या तोंडावर बाजारातील तेल, रवा, बेसन, मैदा, खवा, वनस्पती तूप या पदार्थांमध्ये भेसळ वाढल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. शेंगदाण्याला हिरवा रंग लावून पिस्ता म्हणून सोनपापडीवर लावणे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाईमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रंग वापरल्याच्या घटनाही उघड होत आहेत.
‘दिवाळीसाठी पुण्यात मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यासाठी गुजरातहून दरवर्षीप्रमाणे यंदाही खवा अथवा बर्फी विक्रीसाठी पुण्यात आणण्यात येतो. गुजरातची ‘स्पेशल बर्फी’ ट्रॅव्हल्समधून कल्याणमार्गे शनिवारी पुण्यात विक्रीसाठी आणली होती. सहा लाख ७१ हजार ५२० रुपये किमतीची ४ हजार १९७ किलो बर्फी भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आली. संबंधितांकडे चौकशी केली असता ही बर्फी दूध पावडर आणि खाद्यतेलाच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यात ही स्पेशल बर्फी ८० रुपये किलो दराने विकण्यात येणार होती. कारवाईमुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला,’ अशी माहिती सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.
शनिवारनंतर सोमवारीही गुजरातहून पुन्हा ७१९ किलोची बर्फी बुधवार पेठेतील एका मोबाइल विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा घालून कारवाई केली. तेथून एक लाख १५ हजार ४० रुपये किमतीचा स्पेशल बर्फीचा साठा जप्त करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
‘स्पेशल बर्फी’ म्हणून पुण्यात आलेल्या बर्फीचा उत्पादक कोण आहे याचा तपास गुजरातमधील एफडीएच्या सहायाने करण्यात येईल. बर्फीचे आठ नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासण्यास पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर उत्पादकांना नोटीस पाठविण्याची कारवाई करण्यात येईल.अशी माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त एफडीए, पुणे विभाग यांनी दिली
देशातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीमध्ये मागणी असणाऱ्या पदार्थांची कसून तपासणीची मोहीम अन्न व औषध द्रव्य प्रशासनाने (एफडीए) १०ते १९ ऑक्टोबर या दरम्यान शहरात राबविली. या मोहिमेतून धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. यात ३७३ प्रकारचे नमुने घेतले असून, १७लाख ४०हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती “एफडीए‘चे (अन्न) सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
काजू, स्ट्रॉबेरी आणि केशर पेढ्याच्या नमुन्यांमध्ये खाण्याच्या रंगाचा अतिवापर केल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. १००”पार्टस पर मिलियन‘ (पीपीएम) खाद्यरंग पदार्थांमध्ये वापरण्यास परवानगी आहे. पण या पदार्थांमध्ये ५००”पीपीएम‘पर्यंत रंग घातला होता. त्यामुळे संबंधित अन्नपदार्थ असुरक्षित असल्याचे नमूद केले आहे. तसेच, सोनपापडीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेंगदाण्याला हिरवा रंग लावून त्यावर ठेवल्याचे पिंपरीतील एका दुकानात आढळले, अशी माहितीही त्यांनी दिली.
केकरे म्हणाले, “”वापरलेल्या डब्यात पुन्हा तेल ओतून विक्री करत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले. त्यातून ७ लाख ३१ हजार ३६१रुपयांचे तेल जप्त केले आहे. तसेच ३८ हजार २००रुपयांचे वनस्पती तूपही जप्त केले. दिवाळीसाठी मागणी वाढत असलेले रवा, मैदा, खवा या पदार्थांचे नमुने घेतले. त्यात मध्य प्रदेश येथून आलेल्या बेसनामध्ये लाख डाळीची भेसळ केल्याचे सिद्ध झाले आहे. असे८२ हजार ३४२ रुपयांचे बेसन आणि दोन लाख१७ हजार रुपयांचा मैदा जप्त केला आहे.‘‘
बर्फी चांगली राहण्यासाठी सॉर्बिक ऍसिड (१००० पीपीएम) वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. मात्र, “स्पेशल बर्फी‘त हे प्रमाण ६७०० पीपीएमपर्यंत आढळल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकारच्या बर्फीचे नमुने घेण्याचे आदेश अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.