मुंबई, :-
विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे. याबाबत
ग्राहकहित डोळ्यासमोर ठेऊन लवकरात लवकर राज्य शासनाकडून सूचना पाठविण्यात येणार आहेत, अशी
माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत दिली.
विद्युत अधिनियम 2003 मधील सुधारणांबाबत राज्याची भूमिका समजाऊन घेण्यासाठी खासदार
किरीट सोमय्या ना. बावनकुळे यांना मुंबईत भेटले. तेव्हा ना. बावनकुळे यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली.
“विद्युत सुधारणा बील 2014” च्या अनुषंगाने अभ्यास करून संसदेला अहवाल सादर करण्याची जबाबदारी
श्री. सोमय्या यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
याबाबत सविस्तर अभ्यास करून किमान वेळेत राज्याची भूमिका केंद्राकडे स्पष्ट केली जावी, असे निर्देशही ना.
बावनकुळे यांनी या बैठकीत प्रधान सचिव ऊर्जा आणि तिनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले.
या प्रसंगी ऊर्जा सचिव श्री. मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओम प्रकाश गुप्ता,
महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी व महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव
कुमार मित्तल इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांत सुरूं असलेल्या
विविध कामांचा आढावाही घेतला व कालबध्द मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

