आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम जलतरणपटू आणि यलो सिनेमाची नायिका ‘ गौरी गाडगीळ हिच्यावर तिची आई स्नेहा गाडगीळ यांनी लिहिलेले ‘राजहंस ‘ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन श्री बापट यांच्या हस्ते झाले . यावेळी ते बोलत होते . अभिनेता उपेंद्र लिमये , दिग्दर्शक महेश लिमये , शिरीष फडतरे , गौरीचे आई बाबा स्नेहा आणि शेखर तसेच पुस्तकाचे प्रकाशक ‘सलाम पुणे’ चे अध्यक्ष शरद लोणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . यावेळी गौरी हिचा २५ वा वाढदिवस ही व्यासपीठावर साजरा करण्यात आला .
ज्यांना काही उपजतच कमी मिळाले आहे अशांकडे दुर्लक्ष करणे हि अत्यंत मोठी चूक आहे त्यांना समजावून घेणे आणि त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्या गुणांचा विकास करणे महत्वाचे आहे . ते झाले तर अशा व्यक्ती हुशारातल्या हुशार माणसालाही मागे टाकून भरारी घेवू शकतात हे गौरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून सिध्द केले आहे . तिचे आई बाबा तिचे कुटुंब आणि स्वतः गौरी आणि तिला नेहमीच साथ देणारे स.प महाविद्यालय आणि अन्य सहकारी या सर्वांचा त्यात महत्वपूर्ण सहभाग आहे असे ते म्हणाले .
उपेंद्र लिमये यावेळी म्हणाले , यलो च्या चित्रीकरण समयी गौरीने मला पोहण्याचे धडे दिले आणि बरेच काही तिच्याकडून शिकायला मिळाले अशा नायिकेबरोबर काम करणे हा माझा न भूतो न भाविष्यतो असाच अनुभव होता .
महेश लिमये, शिरीष फडतरे आदींची यावेळी भाषणे झाली . स्नेहा गाडगीळ यांनी प्रास्तविक केले तर पल्लवी गाडगीळ यांनी आभार मानले .