पुणे-
भोसरीतील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्यासह तीनजणांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता ज्ञानेश्वर फुगे (रा.भोसरी), गणेश मुनियार आणि रमेश घाडगे (दोघेही रा.गवळीवाडा, खडकी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत भागवत पांडुरंग चाटे (वय ३३, रा.विघ्नहर्ता अपार्टमेंट, सुनीतानगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता फुगे यांची वक्रतुंड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. फिर्यादी चाटे यांनी येथे एप्रिल २0१३ ते १६ जून २0१३ या कालावधीत १३ लाख रुपये गुंतविले. यापोटी चाटेंना सहा महिन्यांसाठी सात टक्के दराने व्याज देण्यात येणार होते.मात्र व्याज आणि मूळ रक्कमही चाटे यांना अद्याप परत करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारतीय दंडविधान कलम ४२0, ४0६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता फुगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सीमा फुगे यांचे पती आहेत. त्यांनी सोन्याचा शर्टतयार केला होता, तेव्हापासून ते भोसरीतील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. खडकी पोलीस ठाण्याचे फौजदार एस. वाय. कामुनी तपास करीत आहेत.