नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूरमधील एका पत्रकाराला पोलिसांनीच जिवंत जाळून टाकल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार राममूर्ती यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळं त्यांची अशी क्रूरपणं हत्या करण्याता आल्याचा आरोप पत्रकाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.तर पोलिसांनी मात्र या पत्रकारानेच आत्महत्या केली असा दावा केला आहे .
जोगेंद्र असं या पत्रकाराचं नाव आहे. जोगेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी राममूर्ती यांच्याविरोधात वर्तमानपत्रात तसंच फेसबुकवर लिखाण केलं होतं. राममूर्ती यांच्या बेकायदा खाणींबद्दल व भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणांवर जोगेंद्र यांनी प्रकाश टाकला होता. त्यामुळं राममूर्ती त्यांच्यावर संतापले होते. जोगेंद्र यांना विविध प्रकरणात अडकविण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र, त्यात यश न आल्यामुळं पोलिसांनीच त्यांना जाळून मारल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.
शाहजहाँपूरचे पोलीस अधीक्षक यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ‘जोगेंद्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली.’