नवी दिल्ली- धर्मनिरपेक्ष सरकार साठी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केलेले शरद पवार आता त्यांच्या दृष्टीने नेहमीच जातीयवादी असलेल्या भाजपा सह काँग्रेस लाही बाजूला सारून या दोन्ही पक्षांच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांची एकजूट होते काय याची नवी चाचपणी करीत असल्याचे वृत्त आहे . गोंधळ आणि गदारोळात संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरफटले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजनीतीने वेग घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मंगळवारी दिल्लीत आल्या असल्याने हीच संधी साधून गैरभाजप, गैरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून बुधवारी सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार असून ममता बॅनर्जी यावेळी उपस्थित राहणार आहेत.पवार आणि ममता यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव आणि के. सी. त्यागी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव किंवा रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय आणि डेरेक ओब्रायन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पक्षांचे लोकसभेत ५१, तर राज्यसभेत ४५ सदस्य आहेत. गैरभाजप-गैरकाँग्रेस आघाडीची चाचपणी करण्याची कल्पना पवार यांनी मांडल्यानंतर ज्येष्ठ नेत्याच्या नात्याने आपणच त्यात पुढाकार घेऊन आपल्या निवासस्थानी तशी बैठक बोलवावी, अशी सूचना ममतांनी केली. त्यानुसार पवार यांच्या ६ जनपथ येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. तत्पूर्वी, सायंकाळी ४ वाजता ममता पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार आहेत.
गेल्या चार दशकांपासून राजकारणात असलेल्या ममतांना दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रथमच एवढा प्रतिसाद लाभत आहे. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी ममतांचे आगमन झाल्यानंतर संसद भवनात त्यांच्या समर्थकांनी स्वागतपर घोषणा दिल्या. संसदेत प्रवेश केल्यानंतर ममता शेवटपर्यंत व्यस्त होत्या. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तृणमूल काँग्रेसचे सर्व ३४ खासदार त्यांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्यासोबत तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ममता संसद भवनाच्या तळमजल्यावर मिळालेल्या पक्षाच्या नव्या कार्यालयात विविध नेत्यांशी भेटीगाठी घेण्यात व्यस्त झाल्या.