– लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स, विद्वान विक्कू विनायकराम – सेल्वा गणेश, गणेश राजगोपालन – कुमरेश राजगोपालन आणि तौफिक कुरेशी – उस्ताद झाकीर हुसेन यांच्या एकत्रित सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध
– पहिल्यांदाच नात्यातील चार गुरु शिष्यांचे एकत्रित सादारीकरण
पुणे – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची गुरु शिष्य परंपरा जपत, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत चार गुरु – शिष्यांच्या जोडीने पहिल्यांदाच एकत्रित सादर केलेल्या अनोख्या सांगीतिक कलाविष्कारातून भारतीय संगीताची ‘विरासत’ पुणेकरांसमोर उलगडली. निमित्त होते, ‘मिराज क्रिएशन्स’ निर्मित आणि राहुल रानडे प्रस्तुत रक्ताच्या नात्यातील गुरु शिष्यांच्या ‘विरासत’ या संगीत मैफलीचे.
महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे आयोजित या अनोख्या संगीत मैफलीची सुरुवात सुप्रसिद्ध दक्षिणात्य व्हायोनील वादक गणेश आणि कुमरेश यांच्या जुगलबंदीने झाली. त्यांनी ‘अधुभूत’ ही पल्लवी सादर केली. अत्यंत सुमधुर मुद्रेतील हा राग ऐकून प्रेक्षक भारावून गेले. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांचे बंधू तालवादक तौफिक कुरेशी यांच्या साथीने आपल्या कलात्मक अविष्कारातून श्रोत्यांना संगीताची नादमय प्रचीती घडवून आणली.
जेष्ठ घटम वादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण विक्कू विनायकराम यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना टाळ्यांच्या सहाय्याने वादनात समाविष्ट करवून घेतले. विक्कुजींनी आपले सुपुत्र सेल्वा गणेश यांच्या सोबत खास कर्नाटक शैलीत तालवादन सादर केले. सेल्वा गणेश यांचे एकल वादनही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.
त्यानंतर मैफलीत प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश राजगोपालन आणि कुमरेश राजगोपालन यांनी चारुकेशी रागाचे सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली. तौफिक कुरेशी, उस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी रसिकांना भावली. पारंपारीकते बरोबरच लुई बँक्स आणि जीनो बँक्स यांसारखी पिता पुत्राची आधुनिक संगीताची साधना असणारी जोडी देखील होती. लुई बँक्स यांनी पियानो वरील कसब आणि जीनो यांची ड्रम वरील तालाची विविधता प्रेक्षकांना वेड लाऊन गेली. जीनो बँक्स, झाकीर हुसेन आणि तौफिक कुरेशी यांचे पाश्चिमात्य शैलीतील सादरीकरण मैफलीचे विशेष आकर्षण ठरले.
पुण्याच्या ‘विरासत’ मधे मानाचं स्थान असलेले पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती व त्यांची धुरा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र डॉ. पराग संचेती आणि कन्या सौ. मनीषा संचेती-संघवी यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ या पिता – पुत्राच्या जोडीने केले. या मैफलीला प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे, अभिनेते सचिन खेडेकर, सुनील बर्वे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मैफलीच्या समारोपाला सर्व कलाकारांनी मिळून ‘पीस कॉल’ या पारंपरिक आणि पाश्चिमात्य संगीताचे मिश्रण असलेल्या कलाप्रकाराचे सादरीकरण केले.
या मैफलीच्या व्यवस्थापनात श्याम भूतकर यांनी रंगमंच, हर्षवर्धन पाठक यांनी लाईट्स, मुजीब दादरकर यांनी ध्वनी संयोजन, सचिन नाईक यांनी ध्वनीयंत्रणा, तर जाहिरात डिझाईन मिलिंद मटकर यांनी केले. मैफलीचे इव्हेंट मेँनेजमेंट ‘ए – फील्ड प्रा. ली.’ तर पी.आर. ‘लीड मिडिया’ यांनी सांभाळले. ‘विरासत’ या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया, आय.आर.बी, विलास जावडेकर असोसिएट्स असून विविध पार्टनर्स पू. ना. गाडगीळ (नळ स्टॉप शोरूम), केसरी टूर्स, गिरिकंद हॉलिडेज, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सर्व्हिसेस व रेडिओ सिटी होते.
![](https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif)