सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लुटारू टोळीने राज्याला व देशाला अनेक वर्षांपासून लुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या योजना न राबवणार्या राज्य शासनाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ असून देशाच्या अखंडता, एकतेसाठी राज्या-राज्यांत फूट पाडणार्यांना हद्दपार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.महाराष्ट्रात ही पहिलीच निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे आमची भाजपा-शिवसेना युती तुटली आहे; पण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला अतिशय आदर, श्रद्धा आहे. बाळासाहेबांनी अतिशय कष्टाने सेनेची स्थापना केली आहे. त्या वेळी अनेकांच्या टीकाही त्यांनी सहन केल्या आहेत. त्यांनी आपले आयुष्य शिवसेनेसाठी सर्मपित केले आहे. त्यांच्या संकल्प शक्तीचा मी आदर करतो. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की या निवडणुकीत शिवसेनेवर टीका करणार नाही. त्यांच्यावर टीका न करणे हीच माझी त्यांना आदरांजली ठरेल. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत नाही. काही तत्त्वे असतात. त्यामुळेच मी शिवसेनेवर टीका करत नाही, असे स्पष्टीकरण या वेळी नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथील सभेत दिले.