पुणे ः
कृत्रिम पायाने एव्हरेस्टसह जगातील तीन सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावरील “फिरूनी नवी जन्मेन मी’ या मराठी पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’चे संस्थापक अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन समारंभ “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला.
मूळ इंग्रजी “”बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन” या पुस्तकाचा मराठी अनुवाद निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांनी केला आहे. या प्रकाशन समारंभाला अरुणिमा सिन्हा उपस्थित होत्या. या मराठी पुस्तकाचे प्रकाशन “प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी केले आहे. अरूणिमा सिन्हा या “बीव्हीजी इंडिया लि’ या कंपनीच्या “ब्रॅण्ड ऍबॅसिडर’ आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.
“अरुणिमा सिन्हा यांची जिद्द तरुणपिढीला प्रेरणादायक असून आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ने सामाजिक दृष्टीकोनातून अरुणिमा सिन्हाच्या जगातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमेला केलेले सहकार्य या गोष्टी तरुणपिढीसाठी प्रेरक आहेत. अरुणिमा सिन्हा यांनी अपंग क्रीडा पटूंसाठी महाराष्ट्रात प्रशिक्षण अकादमी उघडावी, महाराष्ट्र शासन या अकादमीला पूर्ण सहकार्य करेन,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच “अरुणिमा सिन्हा आणि हनुमंतराव गायकवाड हे दोघेही प्रेरणादायी व्यक्ती आहेत’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना काढले.
“या पुस्तकाच्या तीन हजार प्रती शाळांमध्ये वितरित केल्या जातील.’ अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनावरील पेन्ग्विन प्रकाशनाच्या “बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे लेखन मनीषचंद्र पांडे यांनी केले आहे.
“अरुणिमा सिन्हाला जगातील सर्वोच्च तीन शिखरे पादक्रांत करण्यासाठी “बीव्हीजी इंडिया’ने सहकार्य केलेले आहे, आणखी तीन सर्वोच्च शिखरांच्या मोहिमेसाठी कंपनी मदत करेल’, असे बीव्हीजी इंडिया लि. संस्थापक एच. आर. गायकवाड यांनी यावेळी बोलताना केले. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर या कार्यक्रमाचे निमंत्रक होते. “ई -बुक’चे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले.