मुंबई: दिवंगत नेते आर आर पाटील यांनी सुरु केलेल्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला आता तिलांजली देण्यात आली असून स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी स्वच्छतेची’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. अभिनेता आमीर खान या अभियानाचा ब्रँड अँबेसिडर असून मुंबईत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
विकासाच्या वाटचालीत स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच आमीर खानसोबत दुष्काळावर चर्चा झाली असून, जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीर मदत करायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान फडणवीस सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे नाव का बदलले असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.
“गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानाने राज्यातच नाही तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला होता. दिवंगत नेते आर आर पाटील यांनी ही संकल्पना राबवली होती. मात्र फडणवीस सरकार आमीर खानला ब्रँड अम्बेसिडर बनवत आहे. पण या अभियानाचं नाव बदलून, या सरकारने आपली पातळी दाखवून दिली”, असा घणाघात तटकरे यांनी केला.




