“मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रकल्पास उत्तम प्रतिसाद
पुणे:
“गरोदरपणाच्या नवव्या महिन्यातील स्त्रियांसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या “डायल 108′ सवेतर्फे विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवे द्वारे शासनाकडे नोंदणी केलेल्या गरोदर स्त्रियांना रूग्णवाहिका सेवेकडून दूरध्वनी केला आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर रूग्णवाहिका बोलावण्यास उशीर केला जाऊ नये आणि लवकर मदत मिळून मातामृत्यू व अर्भक मृत्यू टाळता यावेत असा या सेवेचा उद्देश आहे.’ अशी माहिती “महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
दररोज राज्यात 10 ते 15 बाळंतपणे रूग्णवाहिकेत होत असून डॉक्टर ही आपत्कालीन मदत सुरक्षितपणे हाताळत आहेत. “26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायलच्या वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत.
“रोजच्या आकडेवारीनुवार 35 ते 40 टक्के म्हणजे साधारणत : 400 ते 450 गरोदर स्त्रियांना 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिका मदत करत आहेत. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यावर रूग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यास उशीर करू नये, तसेच गुंतागुंत टाळण्यासाठी रूग्णालयात वेळोवेळी तपासणी गरजेची आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून यासाठीचा पथदर्शी प्रकल्प चालवला गेला. जूनपासून हा प्रकल्प पूर्णत: सुरू केला जात आहे. “मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ या प्रकल्पाअंतर्गत गोळा होणारी गरोदर मातांची आकडेवारी यासाठी वापरली जाते.
राज्यात दररोज सुमारे 4 हजार बाळंतपणे होत असून त्यातील 40 ते 50 टक्के बाळंतपणे खासगी रूग्णालयात, तर 50 ते 60 टक्के शासकीय रूग्णालयात होणाऱ्या बाळंतपणापैकी 20 ते 25 टक्के गरोदर स्त्रिया 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची मदत घेऊन रूग्णालयात दाखल झालेल्या असतात’ अशी माहिती डॉ. प्रविण साधले यांनी दिली.
दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून ते 17 जून 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डायल 108 रूग्णवाहिकेत झालेल्या प्रसुतीची जिल्हानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे अहमदनगर (161), अकोला (90), अमरावती (109), औरंगाबाद (214), बीड (189), भंडारा (32), बुलढाणा (121), चंद्रपूर (73), धुळे (75), गडचिरोली (72), गोंदीया (43), हिंगोली (87), जळगांव (90), जालना (93), कोल्हापूर (109), लातूर (162), मुंबई (45), नागपूर (97), नांदेड (154), नंदूरबार (84), नाशिक (212), उस्मानाबाद (124), परभणी (73), पुणे (255), रायगड (34), रत्नागिरी (29), सांगली (98), सातारा (135), सिंधुदूर्ग (16), सोलापूर (244), ठाणे (119), वर्धा (23), वाशिम (63), यवतमाळ (110), पालघर (67).