मुंबई-‘गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’अशी स्फूर्ती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिली वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज महापालिका अधिकारी व गणेशोत्सव समन्वय समितीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव यांनी गणेशोत्सव मंडळांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी गणेशोत्सवातील जल्लोषाला विरोध करणाऱ्यांवर आणि त्याविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ‘गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार? या उत्सवाला ब्रिटिशांनी विरोध केला नाही, मग तुम्ही का विरोध करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच, ‘हा मुर्दाडांचा उत्सव नाही, जिवंत माणसांचा उत्सव आहे तो दणक्यातच साजरा होणार,’ असे उद्धव यांनी विरोधकांना ठणकावले.
प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी काही-ना-काही अडथळे आणणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. ‘गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी मंडळांच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावे, असं उद्धव म्हणाले. ‘शहरात बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. या विरोधात कोणाला न्यायालयात जावेसे वाटत नाही. पण आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का,’ असा संताप व्यक्त करून, ‘विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’ असे आश्वासन उद्धव यांनी यावेळी समन्वय समितीला दिले. गणेशोत्सव समितीसाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.