अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग दुरूस्ती, डागडुजी, तातडीने करावी अन्यथा संबंधिताना कारवाईस सामोरे जावे लागले, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिले. महामार्ग दुरूस्ती व त्यासंबंधी महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, सहायक जिल्हाधिकारी तथा पेण येथील उपविभागीय अधिकारी निधी चौधरी, अपर पोलीस अधीक्षक राजा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, गणेशोत्सवापुर्वी महामार्गाच्या दुरूस्तीची कामे संबंधित यंत्रणेने पूर्ण करावीत. तसेच या कामाची पाहणी करण्याकरिता पेण, रोहा, महाड प्रांत त्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी संबंधित कंत्राटदारासह अहवाल सादर करावा. डिमार्केशनसंदर्भात झालेल्या भुसंपादनानुसारही कार्यवाही करण्यात येईल. या महामार्गावर तयार झालेले काही रस्ते (पॅचेस) प्रशासनाच्या सहमतीने गणेशोत्सवासाठी वाहतुकीस खुले करण्यात यावे. भोगावती नदीवरील पूल, वडखळ येथील खड्ड्यांची दुरूस्ती आदीही कामे तातडीने पूर्ण करावी.
पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीनुसार राष्ट्रीय महामार्ग 17 वर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या पोलिसांनी अधोरेखित केलेल्या 42 अपघात प्रणव ठिकाणांवर साईन बोर्ड, ब्लिंकर, बॅरिकेट्स लावण्याबाबतचीही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णवाहिका सुसज्ज ठेऊन डॉक्टरांचे पथकही तयार ठेवावे. याखेरीज एस.टी. महामंडळाच्या बसेस, इतर वाहतूक, परिवहन विभागाचे कामकाज यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस महाड प्रांत सुषमा सातपुते, रोहा प्रांत सुभाष भागडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजन दंदाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल अ.द.येवला, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण एस.एस.कामत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागावकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, एस.टी.विभाग नियंत्रक अजित गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, सुप्रीम कन्स्ट्रकशनचे श्री.गोरुले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

