मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्र संस्कृतीचा एक आगळावेगळा चैतन्यस्त्रोत आहे. समाजमन प्रेरित करण्याची अभूतपूर्व क्षमता असणाऱ्या या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, राज्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी समाज संघटित करण्याच्या उदात्त हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास प्रारंभ केला. देशास राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी सामाजिक-सांस्कृतिक प्रबोधनासाठीचा संघर्ष आजही सुरुच आहे. त्यासाठी गणेशोत्सव अतिशय प्रभावी असे माध्यम आहे. त्यादृष्टीने राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रबोधनपर जाणिवा रुजविण्यासाठी या उत्सवाच्या माध्यमातून डोळस प्रयत्न करावेत. त्यासोबतच सामाजिक सलोखा व सांस्कृतिक मूल्यांच्या जोपासनेसह पर्यावरण संवर्धनासाठीही जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.