गटारी अमावास्ये ऐवजी दीप अमावस्या साजरी करून व्यसनमुक्तीचा संदेश ! श्रावण महिन्याचे सामुहिक स्वागत
पुणे :
आषाढी अमावस्येनि मित्त (गटारी अमावस्या) विविध सामिष सेलिब्रेशन ,मद्यसेवनाचा पूर येत असताना, व्यसन मुक्तीचा संदेश देण्यासाठी, दीप अमावस्येची सायंकाळ ही दीप पूजनाची, प्रकाशाच्या पूजेची आणि श्रावणाचे स्वागत करण्याची आहे, हे अधोरेखीत करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेच्या वतीने शुक्रवारी (,दिनांक 14 ऑगस्ट रोजी ) सायंकाळी 7 वाजता टिळक रस्त्यावरील नवी पेठ विठ्ठल मंदिर येथे दीप अमावस्या साजरी करण्यात आली
१४५ वर्षापूर्वीच्या या पुरातन विठ्ठल -रखुमाई मंदिरात महिला ,युवतींनी तसेच भाविकांनी मोठी गर्दी केली होती
सणांचा कालोचित अर्थ सांगणाऱ्या या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष होते . महिला व युवतींना एकत्र करून सामूहिक दीपपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला , सामुहिक आरती करण्यात आली अशी माहिती संस्थेच्या संचालक गौरी बिडकर यांनी दिली. हा कार्यक्रम नवी पेठ विठ्ठल मंदीर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला
आषाढ संपत आहे, श्रावण येत आहे, आषाढ समाप्ती अमावस्येने होते, या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणते, खरे तर याच दिवशी दीप अमावस्या असते. ‘दिव्याची अमावस्या’ही दीप पूजनाची मानली जाते. घरातील सर्व दिवे छान घासून पुसून लख्ख करून त्याची पूजा करावी. प्रकाशाची कहाणी ऐकून संस्कृतीचा जागर करणार्या श्रावणाचे स्वागत करण्याचा दिवस आहे, असा संदेश या दीपपूजनाने मिळतो’, असे धार्मिक ग्रंथांमधेही नमूद केले आहे’ असे यावेळी सांगण्यात आले
‘नको व्यसनाचा अंधार, हवा ज्ञानाचा प्रकाश’ ,‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या घोषणांचे फलक लावण्यात आले होते . विविध आकार, रंगांचे, पारंपरिक दिवे, पणत्या-निरांजने, समया यांचे पूजन केले गेले . या निमित्ताने विविध दिवे पाहायला मिळाले . आपल्या मूळ संस्कृतीनुसार सण साजरे करून त्यातील सामाजिक संदेश पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे गौरी बिडकर यांनी सांगितले.
सदाशिव भावे ,अपर्णा भावे या दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल -रखुमाई ची आरती करण्यात आली . मंदिराचे विश्वस्त संजय गाडे ,नितीन नवले ,श्रीकांत पवार तसेच ललित राठी ,नेहा मुथियान ,बाळासाहेब कुलकर्णी (पुजारी ) ,दीपक बिडकर ,सौ गायत्री कोकिळ उपस्थित होते