पुणे :आर एस एस चा स्पष्ट पाठींबा मिळालेले एफटीआयआय चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता पुण्याबरोबर थेट दिल्ली दरबारीदेखील सुरु करण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय, या आंदोलनामध्ये ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‘ आणि ‘आयआयटी-दिल्ली‘च्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल,‘‘ असे विद्यार्थ्यांतर्फे सांगण्यात आले
‘‘एफटीआयआय सोसायटी‘ विसर्जित करण्याची प्रमुख मागणी मागे घेतल्याशिवाय सरकार कोणत्याही संवादासाठी पुढाकार घेणार नाही,‘ असे संचालक प्रशांत पाठराबे यांच्यामार्फत सरकारने विद्यार्थ्यांना कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एफटीआयआय‘च्या विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद आज (बुधवार) झाली. “येत्या 3 ऑगस्ट रोजी दिल्लीत आंदोलन होणार असले, तरीही पुण्यातले आंदोलनही सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारवर अधिक दडपण आणण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा विचार आम्ही केला. दिल्लीत जाऊन आमचा आवाज अधिक ‘व्यापक‘ होईल. विविध पक्षांच्या खासदारांना आम्ही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यांच्याकडूनही मदतीची अपेक्षा आहे.