गंगाणी यांच्या कथकविष्कारास पुणेकरांची भरभरून दाद
पुणे- धत्, धत् उथान, थाई का कमाल, धा बेसिक, डगर अशा कथक नृत्यातील नानाविध अविष्कार सादर करून प्रसिद्ध कथक नृत्यकार राजेंद्र गंगाणी यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. निमित्त होते उद्गार संस्थेतर्फे झालेल्या डगर चलत या नृत्य व वादनावर आधारित मैफलीचे.
शास्त्रीय संगीत व नृत्य यांची जोपासना करणाऱ्या उदगार संस्थेतर्फे ‘डगर चलत’ या शास्त्रीय मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफीलीचे उद्घाटन उदगार संस्थेच्या अध्यक्षा आसावरी पाटणकर यांच्या कथक नृत्याने झाले.
राजेंद्र गंगाणी यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या खास नृत्य शैलीतून सादर केलेला २१ सलामीचा नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ते मंचावर येताच रसिकांनी त्यांना उत्स्फुर्त दाद दिली. गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांना स्मरून ते म्हणाले की, “गुरू आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका बजावत असतात, ते आपल्याला त्यांचे ज्ञान वितरीत करून आपले आयुष्य फुलासारखे सुगंधित करतात”.