खा.वंदना चव्हाण यांनी घेतली आयुक्तांसमवेत बैठक
पुणे:
‘ब्रँडिंग पुणे’, हेरिटेज पर्यटन, ‘सायन्स पार्क’ ची उभारणी ‘दिल्ली हट’ च्या धर्तीवर ‘पुणे हट’ ‘बाजार प्रदर्शन’, नदीत पडणारा राडारोडा तातडीने थांबविणे अशा अनेक महत्वाच्या मुद्यांसाठी आज खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बापूसाहेब कर्णेगुरूजी, हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे, उद्यान विभाग प्रमुख घोरपडे, अतिरीक्त आयुक्त ॐप्रकाश बकोरिया,शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रवी चौधरी, संघटक युवती राष्ट्रवादी काँग्रेस मनाली भिलारे, आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘ब्रँडिंग पुणे’ साठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा घडविली पाहिजे. ब्रँडिंगच्या वास्तू केल्या पाहिजेत आणि हेरिटेज पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ‘सायन्स पार्क’ च्या उभारणी गती देण्याबरोबर फुलपाखरू उद्यान, पुणे शहराची प्रवेश द्वारे, पेशवे पार्कचे उर्जा उद्यान पुन्हा सुरू करणे अशा मुद्यांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वज्ञारे सांगितले. पर्यटन प्रकल्पांना पाठपुरावा करण्यासाठी विविध क्षेत्रातील पुणेकर नागरिकांची समिती स्थापन करण्याची सूचना अॅड.वंदना च्वहाण यांनी केली.
नदी पात्रात सातत्याने राडारोडा टाकला जात असल्याकडे खा.चव्हाण यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. कचरा व्यवस्थापनाचा आराखडा, ‘अॅमिनीटी स्पेस’चे मॅपिंग यावरही चर्चा झाली.
‘दिल्ली हट‘ च्या धर्तीवर पु.ल.देशपांडे उद्यानानजिक ‘पुणे हट’ हे प्रदर्शन व्यापार केंद्र सुरू करण्याबाबत अॅड. चव्हाण आग्रही आहेत.
पुणे दर्शन बस आकर्षक करणे, बंडगार्डन ला आर्ट प्लाझा करणे. पर्यटकांसाठी माहिती केंद्र उभारणे अशा सूचना करण्यात आल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला लक्ष्मी रस्त्यावर नागरिक पर्यटकांना बैठक व्यवस्था करणे, सांस्कृतिक उत्सवांचे कॅलेंडर करणे, ब्रोशर करणे यावरही चर्चा झाली.