‘खराब राज्यव्यवस्था हे देशासमोरील मोठे आव्हानं’ : डॉ. विश्वंभर चौधरी
पुणे :
‘पाण्यासारखे अनेक मुलभूत प्रश्न सुटलेले नसताना भारत महासत्ता होईल हे स्वप्न म्हणजे मृगजळ ठरते, अशावेळी युवकांनी सर्वांगीण विकासासाठी संर्वेधानिक मार्गांनी पुढे आले पाहिजे. देशाचे रूप पालटण्याची क्षमता युवकांमध्ये आहे. मात्र, त्यांनी विकसनशील आणि सर्वसमावेशक विचारधारा स्वीकारण्याची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले. ते ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्या ‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’तर्फे देण्यात येणार्या या पुरस्कारांचे यंदाचे सातवे वर्ष होते.
डॉ. चौधरी म्हणाले, ‘खराब राजकीय व्यवस्थेमुळे देशातील नागरिकांनी दशकानुदशके कर भरूनही अपेक्षित विकास झाला नाही. अनेक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे कार्यकर्ते करतात ते काम प्रत्यक्षात सरकारने करणे अपेक्षित असते. पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विध्वंस न करता विकासाच्या मार्गावर चालण्याचे आव्हान सर्वांनी पेलले पाहिजे. लोकशाही मार्गानेच देश मजबूत केला पाहिजे.’
डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे. अनेक गोष्टींची निर्मिती करण्यासाठी करिअर करणारे युवक- युवती आपल्याला दिसतात. मात्र, संविधानाच्या आधारे मजबूत देशाची निर्मिती करणारे युवक हवे आहेत. सर्वधर्मांना, मागासांना, अल्पसंख्यकांना बरोबर घेऊन सर्व जगात सर्वोत्कृष्ट देश म्हणून भारताला पुढे आणले पाहिजे.’
या वर्षीचे ‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2015’ पारितोषिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते ‘मिशन फॉर ट्रास्फॉर्मेशन ऑफ रूरल एरिया’ (‘मित्र’) संस्थेचे प्रमुख, एक हजार शहरे ‘हरित विकसित शहरे’ करण्याच्या संकल्पनेबद्दल अनंतराव अभंग यांना, प्रा.शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते), दुष्काळी भागातील नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सुनील जोशी (संघटक, जलबिरादरी पुणे), डॉ.मंदार अक्कलकोटकर (आयुर्वेदतज्ज्ञ, वनीकरण प्रसारक) यांना प्रदान करण्यात आला.
तसेच ‘पी.ए.इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्कार’ डॉ. किरण भिसे (प्राचार्य, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी) आणि श्रीमती जयश्री पवार (कर्मचारी, हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट) यांना देण्यात आला.
हा वितरण समारंभ ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या असेंब्ली हॉलमध्ये सोमवारी सकाळी झाला.
पुस्कार्थींनी आपली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी केले. सूत्रसंचालन गौरी बिडकर (संचालक, प्रबोधन माध्यम) यांनी केले तर एम.सी.ई.सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले..