पुणे, दि. 28 : खडकी येथील नवा बझारमधील तीन दुकानांत सुरु असलेली 2 लाख 50 हजार 284 रुपयांची वीजचोरी महावितरणच्या तपासणी मोहिमेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की शिवाजीनगर विभाग अंतर्गत खडकी येथील नवा बझार येथे रमेश देवराज पारेख यांचे प्रकाश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासाठी असलेल्या वाणिज्यिक वीजजोडणीच्या मीटरचे सील तोडलेले आढळले. यात वीजमीटरमध्ये फेरफार करून 5860 युनिटची म्हणजे 83 हजार 187 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. तर वाणिज्यिक वीजजोडणीच्या मीटरमध्ये फेरफार करून निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांच्या संस्कार नावाच्या कपड्यांच्या दुकानात 5127 युनिटची म्हणजे 79 हजार 492 रुपयांची तसेच प्रवीण विजय गर्ग यांच्या मिठाईच्या दुकानात 7570 युनिटची म्हणजे 87 हजार 605 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदुर्ग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. मनीष सूर्यवंशी, श्री. गणेश शामसे, सहाय्यक अभियंता मनोज पाटील, श्री. अभय शामराज, सौ. सोनाली मोदीराज, जनमित्र सुरेश खरात, अशोक घिरे आदींनी ही वीजचोरी उघड करण्याची कामगिरी केली.
या तिनही वेगवेगळ्या वीजचोरीप्रकरणी रमेश देवराज पारेख, प्रवीण विजय गर्ग व निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांच्याविरुद्ध गुरुवारी (दि. 24) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे