पुणे : कुशल क्रेडाई पुणे मेट्रोने प्रशिक्षण दिलेल्या टिकम सिंग आणि परशुराम नायक या दोन कामगारांनी न्यूझिलंड येथे झालेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्यांनी बांधकाम व इमारत निर्माण तंत्रज्ञान या गटात भाग घेतला होता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) पाठविण्यात आलेल्या संघाचा ते महत्वपूर्ण भाग होते. ही स्पर्धा १३ ते १७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली.
न्यूझीलंड येथे झालेल्या या स्पर्धेत टीकम सिंग यांनी ‘भिंती व फरशीवरील टाईलिंग'(वॉल अॅन्ड फ्लोअर टायलिंग) या कौशल्य गटात तर परशुराम नायक यांनी ‘विटांचे बांधकाम’ (ब्रिक लेईंग) या गटात कांस्य पदक मिळवले. विटांचे बांधकाम यासाठी(ब्रिक लेईंग) श्री. कवीश थकवानी तर ‘भिंती व फरशीवरील टाईलिंग’यासाठी (वॉल अॅन्ड फ्लोअर टायलिंग)श्री. मदन ठोंबरे स्पर्धकांसोबत गेले होते यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी प्रशिक्षण घेतले आणि यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेतला.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री. शांतीलाल कटारिया यांनी या मोठ्या यशाबद्दल विजेत्यांचे अभिनंदन करून ते पुढे म्हणाले, की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (एनएसडीसी) प्रथमच बांधकाम तंत्रज्ञानातील या प्रकारासाठीच्या स्पर्धेसाठी हा संघ पाठवण्यात आला होता. तरीसुद्धा कामगारांनी त्यांच्या परिपूर्ण प्रयत्नांनी आपल्या देशाचे नाव जगासमोर उंचावले याचा मला अभिमान वाटतो.
हे यश सांघिक कार्यामुळे आणि कुशलच्या सुकाणू समितीतील श्री. कवीश थकवानी व श्री. मदन ठोंबरे या दोन सदस्यांनी स्पर्धकांना दिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणामुळे प्राप्त होऊ शकले, अशी भावना कुशलचे व्हाईस चेअरमन श्री. रणजीत नाईकनवरे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावर्षीच्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये मध्ये भारताशिवाय कोरिया, कॅनडा, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांनी भाग घेतला होता. एनएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप चिनॉय यांनी कुशलच्या संघाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करून या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.