मुंबई – मुंडे नाहीत आता गडकरीही महाराष्ट्रात नको अशी भूमिका काहींनी घेतल्याचे भाजप वर्तुळात बोलले जाते आहे . पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष शहा यांचा नितीन गडकरींना मुख्यमंत्रीपदी बसविण्यास विरोध असल्याचे पुढे येत आहे. राज्यात गडकरी डोईजड होतील व भविष्यात संघाच्या मदतीने आपल्या वर्चस्वाला हादरा लावू शकतील अशी भीती मोदींना वाटत आहे. याऊलट फडणवीसांना मुख्यमंत्री बसविल्यास त्यांच्यापासून कोणताही धोका नसल्याचे त्यांना ठाऊक आहे. फडणवीस नवखे आहेत, अभ्यासू, मेहनती आहेत. मोदी सांगतील ते फडणवीस ऐकू शकतील अशी स्थिती आहे. याउलट गडकरी मोदींना शह कसा देईल याच्याच खेळ्या ते मुंबईत बसून करीत राहतील अशी भीती मोदी-शहा जोडीला आहे. त्यामुळे गडकरींना दिल्लीतच अडकवून ठेवून त्यांच्यावर बारीक नजर ठेवायची अशी रणनिती मोदींची आहे. मात्र, गडकरींनी ऐन मोक्याची वेळी आपले समर्थक मुनगुंटीवर यांच्या माध्यमातून आमदारांचे शक्तीप्रदर्शन करून मोदी-शहांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता मोदी-शहा कोणत्या खेळ्या करतात याकडे लक्ष आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उघडपणे उतरले आहेत. मंगळवारी सायंकाळी नागपूरात गडकरींचे जंगी स्वागत करण्यात आले. याचबरोबर विदर्भातील सुमारे 40 आमदारांनी गडकरी वाड्यावर धाव घेत तुम्हीच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी याचना केली. त्याआधी मंगळवारी दुपारी भाजपचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावे अशी आमच्या सर्व भाजप नेत्यांची इच्छा असल्याचे सांगत त्यांच्या नावाने लॉबिंग केले.
अखेर गडकरींनी मौन सोडले व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे सांगत राज्यात परतण्याचे संकेत दिले. दुसरीकडे, गडकरींना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यासाठी मोदी-शहा हे प्रयत्नशील असल्याचे कळते आहे. यासाठीच मोदींनी हरयाणातील पक्षाचा नेता निवडला असला तरी महाराष्ट्रातील निवडला नाही. दिवाळीनंतर म्हणजेच रविवारनंतरच आता राज्यातील घडामोडींनी वेग येईल. तोपर्यंत मधल्या चार-पाच दिवस मोदी-शहा कोणत्या खेळ्या करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गडकरींना दूर ठेवण्यासाठी फडणवीस-मुंडे गटाला विरोध करायला लावणे, भविष्यातील गरज म्हणून शिवसेनेला सोबत घेणे व शिवसेनेकडून फडणवीसांच्या नावावर एकमत करवून फडणवीसांनाच मुख्यमंत्रीपदी बसविणे आदी खेळ्या मोदी करू शकतात. मात्र यात आक्रमक मोदी यशस्वी होतात की मुरब्बी गडकरी बाजी मारतात हे लवकरच कळेल.
गडकरींना राष्ट्रवादीने पाठिंबा देण्यामागे व्यावसायिक कनेक्शन असल्याचे कळते आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील व मोठे राज्य आहे. आगामी काळात मुंबईसह महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. मुंबई-बंगलोर औद्योगिक कॉरिडॉर असो की नागपूरमधील मिहान प्रकल्प असो, याचबरोबर नवी मुंबई, चाकण येथील भव्य व हजारो कोट्यावधीचे प्रकल्प असो यात राष्ट्रवादीला व्यावसायिक भागीदारी आहे. नितीन गडकरी राज्यात आल्यास या माध्यमातून आपले हित साधले जाऊ शकते याची जाणीव पवारांना आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊन गडकरींना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. गडकरींचे समर्थक सुधीर मुनगुंटीवर यांनी मंगळवारी केलेले वक्तव्य त्याचेच द्योतक मानले जाते. राष्ट्रवादी जर बिनशर्त पाठिंबा देत असेल तर तो पर्याय स्वीकारला पाहिजे. कोणत्याही अटीशिवाय ते जर पाठिंबा देत असतील त्याचे स्वागतच केले पाहिजे असे मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. आता गडकरींचा डाव मोदी-शहा जोडी कसा उधळून लावते हे पाहणे रंजक ठरणार आहे.