पुणे : कोंढवा येथील मेसर्स के. डी. कलर अॅनोडायझींग या कारखान्यात रिमोट कंट्रोलद्वारे सुरु असलेली 7 लाख 59 हजार 310 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. वीजचोरीसाठी रिमोट कंट्रोलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पाचवा प्रकार महावितरणने उघडकीस आणला आहे.
याबाबत माहिती अशी, रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा येथील बुर्हाणी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील मेसर्स के. डी. कलर अॅनोडायझींग या कारखान्यात औद्योगिक वीजवापराची जोडणी दिलेली आहे. या कारखान्यात अॅल्युमिनीयम धातुवर पावडर कोटींगची प्रक्रिया केली जाते. महावितरणने या कारखान्यातील वीजवापराबाबत केलेल्या विश्लेषणात संशय निर्माण झाल्याने वीजमीटर यंत्रणेची पाहणी करण्यात आली. यात प्रथमदर्शनी वीजभारातील नोदींत तफावत दिसून आल्याने सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) यंत्रणा व वीजमीटर पंचनामा करून पुढील तपासणीसाठी जप्त करण्यात आले. यात वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार करून रिमोट कंट्रोलचे इलेक्ट्रॉनिक्स सर्कीट बसविल्याचे आढळून आले व त्याद्वारे वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत होती. या कारखान्यात 54,008 युनिटची म्हणजे 7 लाख 59 हजार 310 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश एकडे, श्री. दत्तात्रय बनसोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. व्ही. आर. देशमुख, सहाय्यक अभियंता दिनेश बडशे, वैशाली पगारे, श्रीकांत लोथे, जनमित्र दत्तात्रय हांडाळ, शैलेश बनसोड, मनोज बडाम्बे आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मेसर्स के. डी. कलर अॅनोडायझींग कारखान्याच्या जागेचे मालक मदर खान एच. खान व या कारखान्याचे वेगवेगळ्या कालावधीमधील वीजवापरकर्ते संजीवकुमार चंद्गिकाप्रसाद चौधरी व सोहेल युसुफ कोडिया या तीन जणांविरुद्ध सोमवारी (दि. 7) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
———————————————-
गुरुवारी पुणे, पिंपरी शहरात
महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम
मागेल त्यांना वीजजोडणी, वीजयंत्रणेची व देयकांची दुरुस्ती अभियान
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 14 ठिकाणी महावितरणकडून गुरुवारी (दि. 10) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत दिवसभरात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजयंत्रणेची व नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजदेयकांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणच्या 9 विभागअंतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी आवश्यक आहे, अशा 14 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी अन्य ठिकाणांची निवड करून हा एकदिवसीय त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे शहरातील (कंसात विभाग) रामटेकडी परिसर, गाडीतळ (बंडगार्डन), येरवडा परिसर (नगररोड), शिवने परिसर (कोथरूड), भिलारेवाडी-कात्रज, गंजपेठ, भवानीपेठ (पद्मावती), इंदिरानगर, पानमळा व परिसर, शंकर मंदिर जनता वसाहत परिसर (पर्वती), खडकी (शिवाजीनगर), मंगळवार पेठमधील मेलवाणी कंपाऊंड परिसर (रास्तापेठ) आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गाव परिसर (पिंपरी) व महात्मा फुले नगर (भोसरी विभाग) या ठिकाणी गुरुवारी (दि. 10) त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आवश्यकतेनुसार वीजयंत्रणेची दुरुस्ती अभियान, वीजग्राहकांच्या तक्रारींनुसार देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी अंतर्गत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्ती अभियानात वीजखांब, लघु व उच्च दाबाच्या वीजतारांची दुरुस्ती, सर्व्हीस वायर बदलणे, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामे होतील. वीजदेयकांच्या दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांच्या तक्रारीनुसार देयके जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे अशी विविध प्रकारचे कामे करण्यात येणार आहेत. संबंधीत परिसरातील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
याआधी त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाला मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभाग सुरवात झाली आहे. या तिनही विभागांत 17 ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत वीजयंत्रणा दुरुस्ती, वीजदेयकांच्या तक्रारी व नवीन वीजजोडणी आदी विविध प्रकारचे एकूण 3295 कामे करण्यात आली आहे. यात 477 ठिकाणी दिलेल्या नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे.
—————————————————————–
गुरुवारी 14 ग्रामंचायतींमध्ये
महावितरणचा त्रिसुत्री कार्यक्रम
मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागातील आयोजन
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागात गुरुवारी (दि. 10) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभागातील 14 ग्रामपंचायतींमध्ये मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, तक्रारीनुसार वीजदेयकांची व आवश्यकतेनुसार यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
मुळशी विभागातील वाघोली (हडपसर ग्रामीण), कदमवाक वस्ती (उरळीकांचन), कोंढावळे व पिंरगुट (मुळशी), केळवडे (नसरापूर), राजगुरुनगर विभागातील टाकवे (वडगाव), कडूस (राजगुरुनगर) व काळुस (चाकण) आणि मंचर विभागातील गावडेवाडी (मंचर), गंगापूर व पिंपळगाव (घोडेगाव), खिरेश्वर (आळेफाटा), कुसुर (जुन्नर) व निमगाव सावा (नारायणगाव उपविभाग) या 14 ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 10) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत दिवसभरात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजयंत्रणेची व नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजदेयकांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे. संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

