मुंबई -ज्येष्ठ विचारवंत, डाव्या चळवळीचे लढवय्ये नेते अॅड. गोविंदराव पानसरे (८२) यांची गेले पाच दिवस मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर शुक्रवारी रात्री अपयशी ठरलीपानसरे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. . आयुष्यभर विवेकाने विचारांची लढाई लढणाऱ्या पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा खंदा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. पानसरे यांचे पार्थिव आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता कोल्हापुरात नेण्यात येणार असून, दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोमवारी (ता. १६) सकाळी कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्यासह पत्नी उमा पानसरेंही जखमी झाल्या होत्या. हल्लेखोरांनी पानसरेंच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. उपचारासासाठी पानसरे दाम्पत्याला अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेले चार दिवस सुरु असलेल्या उपचारांना पानसरे चांगला प्रतिसाद देत होते. त्यांच्यावरील अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्या होत्या. प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेतला. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला हलविण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार दुपारी अॅस्टर आधारमधील डॉक्टरांच्या संमतीनंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
रात्री दहाच्या सुमारास पानसरे यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला. तसेच त्यांच्या हृदयाचे कार्य थांबले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर पावणेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावरील उपचारांवर देखरेख करणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
कॉ . गोविंद पानसरे लिखित
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील काही लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
शिवाजीला सुद्धाज्ञानेश्वर, तुकाराम, म. गांधी यांच्यासारखं विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध हाेता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा. रयतेला हवं तसं लुटा. खा, प्या, मजा करा. आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा. आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारांत, क्वचित लाखांत खा. आम्ही कोटींत खाऊ.
शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे. पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढताहेत. झेड.पी.ची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कार्पाेरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत…