कोल्हापूर – दाभोळकरांचा खुनी सापडला नसला किंवा त्याबाबत काहीही तपास पुढे सरकला नसला तरी आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी मात्र सांगलीतून समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे . न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली असून , पोलिसांनी दोन कोटी फोन कॉल्स तपासल्यानंतर त्याचे नाव निष्पन्न झाल्याचे सांगितले , तो सनातन संस्थेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या घटनेमुळे दाभोळकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतील काय ? असा प्रश्न आता पुढे उभा राहिला आहे .
सांगली शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या त्याच्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात राहतात.
समीरच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक असून, त्याच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सनातनने म्हटले. शिवाय समीरचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी गायकवाड कुटुंबाला कायदेशीर मदत करणार असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.
15 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील रहत्या घराजवळ हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळ्या झाडल्या.हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली होती. मात्र, त्यांचे प्राण वाचले.