पुणे:- केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजना व कुशल उपक्रमाअंतर्गत येत्या १० वर्षामध्ये देशभरात २० लाख तर पुण्यात १ लाख कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत पुण्यातील १६७ साईटवर किमान २२७७७ कारागिरांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
“प्रशिक्षित कामगारांचा वाढता रोजगार आणि त्यांच्या कामामध्ये आलेली निपुणता हेच कुशलचे खरे उद्दिष्ठ आहे. लहान उपक्रमाचे स्वरूप आज मोठ्या चळवळीत रुपांतर होताना बघून अतिशय समाधान वाटले असल्याची भावना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केली.
तसेच स्वतःच्या कामात आलेले चांगले बदल व कौशल्य विकसाबरोबरच त्यांच्या उत्पादन क्षमतेतही वाढ झाली असल्याची भावना उपस्थित प्रशिक्षित कामगारांनी व्यक्त केली.
‘कुशल’तर्फे २०११ पासून बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जात आहे. ‘कुशल’ने आतापर्यंत २२ हजारांहून अधिक कामगारांना प्रशिक्षित करून उल्लेखनीय यश संपादन केले असल्याची माहिती क्रेडाई कुशलचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी यावेळी दिली. कुशल दिनाच्या निमित्ताने प्लंबिंग, पेंटीग, शटरींग अशा विविध क्षेत्रातील कामगार, कंत्राटदार तसेच सुपरवायसर आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अचलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर बेलवलकर यांनी केले. यावेळी कुशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. आर. शर्मा, फिनोलेक्सचे नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.



