डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १४ व्या २५ हजार डॉलर एनइसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या अंकिता रैना हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान राखले. गेट्रब्रिटनच्या कॅटी डूóो हिने जागतिक १७५ मानांकन असलेल्या अग्रमानांकित अनास्तासिया वास्येलेयेव्हा हिचा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत, एकेरीमध्ये एकमेव भारतीय खेळाडू असलेल्या अंकिता रैनाने आपल्या कामगिरीचा चढता आलेख कायम ठेवला.
काल थायलंडच्या कमोनवान बोयामचा तिसर्या सेटमध्ये पराभव करणार्या अंकिताने आज विजयासाठी जास्त वेळ घेतला नाही. चौथ्या मानांकित अंकिताने सर्बियाच्या निना स्टोजानोव्हिक हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
सहाव्या मानांकित कॅटी डूóो हिने आज सनसनाटी निकालाची नोंद केली. कॅटीने अग्रमानांकित अनास्तासिया वास्येलेयेव्हा हिचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली. फॉर्ममध्ये असलेल्या कॅटीने काल ग्रीसच्या डेस्पिना पापामिकेल हिचाही केवळ दोन सेटमध्ये पराभवकेला होता.
आजही कॅटीने पहिल्या सेटपासून अचूक खेळ करत अनास्तासियावर दबाव निर्माण केला. दुसर्या सेटमध्ये कॅटीने अनास्तासियला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही व विजय मिळवला.
चुरशीच्या झालेल्या सामन्यात जॉर्जीयाच्या सोफिआ शातापावाने पोलंडच्या मॅगडेलेना फ्रेचचा ६-७ (१), ६-४, ६-२ असा पराभव केला. काल मॅरेथॉन सामन्यात सोफिआने प्रार्थना ठोंबरेवर ६-४, ६-७ (७-४), ७-६ (८-६) असा विजय मिळवला होता. आजही सोफिआला विजयासाठी तिसर्या सेटपर्यंत वाट पहावी लागली. रोमानियाच्या क्रिस्टीना एनीने स्विडनच्या एलन आल्गुरीन हिचा ६-४, ६-३ असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
आज झालेल्या दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऋतुजा भोसले व निधी चिलीमुला या खेळाडूंच्या पराभवामुळे भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. ओक्साना कलाशिनिकोव्हा व अनास्तासिया वास्येलेयेव्हा यांनी ऋतुजा भोसले व निधी चिलीमुला यांचा ६-४, ७-६ (३) असा पराभव केला. अँना मॉरगिना व निना स्टोजानोव्हिक यांनी जपानच्या मियाबी इन्वा व मिकी मियामुरा या जोडीचा ६-१, ६-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.शुक्रवार, २६ डिसेंबर सकाळी १0 वाजता एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने होणार असून दुपारी ३ वाजता दुहेरीचा अंतिम सामना होणार आहे.


