पुणे, दि. 03 : महावितरण कृषिसंजीवनी योजनेतून मार्च 2015पर्यंत पुणे परिमंडलातील वीजदेयकांचे थकबाकीदार 35,735 कृषीपंपधारक शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे. या योजनेला येत्या मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आणखी 42365 शेतकर्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, नियमित व प्रामाणिकपणे वीजदेयकांचा भरणा करणार्या पुणे परिमंडलातील 71,264 शेतकर्यांचे या योजनेतून दोन त्रैमासिक वीजदेयकांतील 50 टक्के रक्कम म्हणजे 7 कोटी 7 लाख 79 हजार रुपये माफ करण्यात आले आहेत.
कृषिसंजीवनी 2014 या योजनेत पुणे ग्रामीण मंडलातील मुळशी, मंचर व राजगुरुनगर या विभागांसह रास्तापेठ व गणेशखिंड मंडलमध्ये एकूण 35735 थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकर्यांनी मार्च 2015 पर्यंत मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम म्हणजे 10 कोटी 11 लाख 63 हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या शेतकर्यांचे 50 टक्के मूळ थकबाकी व संपूर्ण व्याज व विलंब शुल्क असे एकूण 15 कोटी 34 लाख रुपये माफ झालेले आहेत.
आता कृषिसंजीवनी योजनेला राज्य शासनाने येत्या मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे पुणे परिमंडलातील आणखी 42,365 कृषीपंपधारक शेतकर्यांना थकबाकीमुक्तीची संधी आहे. या शेतकर्यांकडे एकूण 80 कोटी 6 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आहे. यात मूळ थकबाकीचे 53 कोटी 45 लाख 82 हजार रुपये, विलंब शुल्काचे 1 कोटी 6 लाख 91 हजार व व्याजाच्या 25 कोटी 53 लाख 76 हजार रुपयांचा समावेश आहे. शेतकर्यांनी मूळ थकबाकीच्या 26 कोटी 72 लाख 91 हजार रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के मूळ थकबाकी, संपूर्ण व्याज व दंडाचे एकूण 53 कोटी 33 लाख 58 हजार रुपये माफ होणार आहेत.
योजनेचे स्वरुप – थकबाकीदार कृषीपंपधारकांनी 31 मार्च 2014 पर्यंतच्या मूळ थकबाकीतील 50 टक्के रकमेचा एकरकमी किंवा समान हप्त्यांत येत्या 31 मार्च 2016 पर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के मूळ थकबाकीची रक्कम राज्य शासन महावितरणला अनुदान स्वरुपात देणार आहे. तर विलंब आकार व व्याजाची संपूर्ण रक्कम महावितरणकडून माफ करण्यात येणार आहे. ही योजना तात्पुरत्या व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारकांसाठी तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहणार आहे.
पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, हडपसर, मंचर, राजगुरुनगर, नसरापूर, उरळीकांचन, लोणावळा, तळेगाव, चाकण, वडगाव मावळ, घोडेगाव, आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर या उपविभागातील 37,831 थकबाकीदार कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्तीची संधी आहे. उर्वरित 4534 थकबाकीदार हे रास्तापेठ व गणेशखिंड मंडलातील आहेत.
थकबाकीदार शेतकरी बांधवांनी मुदतवाढ मिळालेल्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या संबंधीत शाखा किंवा उपविभाग कार्यालयांत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

