मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्ष यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.कामराच्या वकिलाने आपल्या अशिलाला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. कामरा यांच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो सध्या पद्दुचेरीत आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराविरोधात समन्स बजावला आहे. यामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कुणाल कामराने आपल्या वकिलांकरवी ही अटकपूर्व याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आपल्याविरोधात दाखल एफआयआर संदर्भात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. त्याच्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कुणाल कामराविरोधात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर नंतर मुंबई स्थित खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 353 (1) (ब), 353(2) व 356(2) (मानहानी) चा दाखला दिला आहे.