पुणे :
केरळमधील शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक नेतृत्व असलेले “श्री एम’ यांच्या नेतृत्वाखालील “मानव एकता मिशन’च्या “वॉक ऑफ होप’ या पदयात्रेचे आगमन उद्या पुण्यातील आझम कॅम्पस येथे होत आहे. कन्याकुमारी ते काश्मीर जाणारी ही पदयात्रा बुधवारी दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आझम कॅम्पस मध्ये येत असून विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती “महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी दिली.
राष्ट्रीय एकात्मता, समता, पर्यावरणपूरक जीवन, महिला सक्षमीकरण, आरोेग्य, शिक्षण आणि युवा कल्याणाचा संदेश घेऊन ही पदयात्रा 12 जानेवारी 2015 युवकदिनापासून कन्याकुमारी येथून सुरू झाली. 2016 मध्ये काश्मीरमध्ये पोहोचण्याचे उद्दीष्ट आहे. दररोज 20 किलोमीटर अंतर चालून पदयात्रा मुक्काम करते. पुण्यातील मुक्कामी दहशतवाद हल्ला झालेल्या कोरेगांव पार्क येथील जर्मन बेकरी ला देखिल हे पदयात्री भेट देतील.