गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्यांना काय हवे, हे पाहून राज्य शासन, केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. लोकांनी हाक मारताच लगेच धावून जात शिवाजीनगर मतदारसंघातील लोकांची कामे केली. विरोधकांनी मात्र गेली पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून मतदारसंघातील लोकांकडे साधे ढुंकूनही बघितले नाही. त्यामुळे मतदार त्यांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिवाजीनगर मतदारसंघातील काँगेस-आरपीआय (कवाडे गट) चे अधिकृत उमेदवार विनायक निम्हण यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काँगेसच्या आमदारांनी आपला निधी कुठे खर्च केला, हे दाखवून द्यावे. फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करण्याशिवाय त्यांनी गेल्या पाच वर्षांत दुसरे काम केलेले नाही. मतदारसंघाची सीमारेषाही त्यांना माहीत असू नये, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पाच वर्षांत त्यांना जनता का दिसली नाही ? आताच का उफाळून आले जनतेवरचे प्रेम? असा खडा सवालही निम्हण यांनी राष्ट्रवादी काँगेसच्या उमेदवारांना केला.
भाजपवाल्यांचीही तीच गत आहे. कुठल्या तरी लाटेत आम्ही विजयी होऊ, हा फुगा याही निवडणुकीत मतदार फोडल्याशिवाय राहणार नाहीत. लाट ही क्षणिक असते. ती थोपवून ठेवता येत नसते, हे भाजपवाल्यांना कुणीतरी जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. शिवाजीनगर मतदारसंघासाठी त्यांना उमेदवार मिळू नये, यातच सर्वकाही आले. मनसेचा उमेदवार तर आपला प्रभाग सोडून बाहेर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तो लोकांना माहीत असण्याचा काही संबंधच नाही. तसेच मतदारसंघातल्या समस्या माहीत असणेही दुरापास्तच आहे. गत निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी निवडून आलेल्या मनसे आमदारांनी काय दिवे लावले, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते निवडून आल्यावर काय करणार, हे मतदारांनाही ठाऊक आहे.
माझे पक्षांतर्गत विरोधक नाहीत. मात्र, सध्या ज्या अफवा उठवल्या जात आहेत, त्या केवळ गैरसमजातून येत आहेत. पक्षातील आम्ही सर्वजण एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात आहोत, हे माझ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे. घरातल्या लोकांचा राग हा क्षणिक असतो. तो राग केव्हाच निवळला आहे. त्यामुळे तेही पक्षाचे काम करीत आहेत.